सदानंद नाईक
उल्हासनगर : नाल्यावरील अवैध बांधकामावर कारवाईसाठी उपोषणाला बसलेल्या विजय सिंग याने गुरवारी दुपारी आयुक्तांच्या गाडी समोर ठाण मांडले. आयुक्त डॉ राजा दयानिधी यांनी गाडी खाली उतरून दोन्ही पायाने अपंग असलेल्या विजय सिंग यांचे म्हणणे एकून घेतले. तसेच चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन दिले.
उल्हासनगर खेमानी परिसरातील अमरधाम मुकुंदनगर नाल्यावरील अवैध बांधकामामुळे पावसाळ्यात घरात पाणी घुसून वित्तहानी होत आहे. अशी तक्रार दोन्ही पायाने अपंग असलेल्या विजय सिंग हे गेल्या एका वर्षा पासून करीत आहेत. मात्र त्यांच्या तक्रारीची दखल प्रभाग समिती क्रं-२ चें सहायक आयुक्त तुषार सोनावानें घेत नसल्याच्या निषेधार्थ विजय सिंग आमरण उपोषणाला महापालिके समोर बसले आहे. तसेच नाल्यातील पाणी बांधलेल्या बांधकामामुळे घरात घुसून कशी परिस्थिती होते. याचें फोटोही तक्रारीत व उपोषण ठिकाणी लावले. मात्र महापालिका प्रशासन त्यांच्या तक्रारीची दखल घेत नसल्याने, त्यांच्या उपोषणाला नागरिकांचा पाठिंबा वाढला.
महापालिका आयुक्त डॉ राजा दयानिधी यांची गाडी महापालिका प्रवेशद्वार मधून गुरवारी दुपारी बाहेर पडताच अपंग असलेले विजय सिंग यांनी गाडी समोर ठाण मांडले. माझे म्हणणे आपणास एकावेच लागेल. अशी मागणी त्याने केली. यावेळी महापालिका सुरक्षा रक्षक व कर्मचाऱ्यांची एकच धावपळ उडाली. उपोषणाला पाठिंबा देणाऱ्यांनी घोषणाबाजी सुरू केली. अखेर आयुक्त डॉ राजा दयानिधी यांना गाडी खाली उतरावे लागले. तसेच उपोषणकर्ते विजय सिंग यांचे म्हणणे ऐकून घेतले. याबाबत माहिती घेऊन अवैध बांधकामावर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. नाल्यावर अवैध बांधलेल्या बांधकामामुळे पावसाळ्यात पाणी असून घरात घुसत आहे. अश्या नाल्यावरील अवैध बांधकामाला महापालिका अधिकारी पाठीशी का घालत आहेत. असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
वालधुनीचे पुराचे पाणी झोपडपट्टीत घुसणार? शहरातून वाहणाऱ्या वालधुनी नदी पात्रात आरसीसीचे बांधकामे नीलम हॉटेल मागे, उल्हासनगर स्टेशन जवळ, हिराघाट आदी ठिकाणी उभे राहिले. या बांधकामाला राजकीय वरदहस्त असल्याने कारवाई होत नसल्याची चर्चा आहे. मात्र येणाऱ्या पावसाळ्यात या ठिकाणी पुराचे पाणी अडून झोपडपट्टीत घुसण्याची शक्यता आहे. यामुळे मोठी अप्रिय घटना घडण्याची चर्चा रंगली आहे. तर महापालिकेने नेहमीप्रमाणे बघ्याची भूमिका घेतल्याची टीका होत आहे.