लोकमत न्यूज नेटवर्क
उल्हासनगर : उसाटणे गावाच्या हद्दीतील डम्पिंग ग्राउंडची महापालिका आयुक्त डॉ. राजा दयानिधी मंगळवारी पाहणी केली असून, डम्पिंग ग्राउंडला विरोध करणाऱ्या नागरिकांची समजूत काढण्यात आयुक्त यशस्वी होतात का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आमदार गणपत गायकवाड यांच्यासह स्थानिकांनी डम्पिंगला विरोध केला आहे.
उल्हासनगरात कॅम्प नं-५ येथील डम्पिंग ग्राउंडला शिवसेनेसह स्थानिक नागरिकांनी विरोध केल्याने, शहरातील कचरा कुठे टाकायचा कुठे? असा प्रश्न प्रशासनाला पडला. शहरात डम्पिंगसाठी पर्यायी जागा उपलब्ध नसल्याने, तत्कालीन आयुक्तांनी राज्य शासनाकडे डम्पिंगसाठी पर्यायी जागेची मागणी केली. शासनाने एमएमआरडीए अंतर्गत येणारी उसाटणे गाव हद्दीतील ३० एकर जागा महापालिकेला कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी तीन वर्षांपूर्वी हस्तांतरित केली. मात्र जागेकडे महापालिकेचे दुर्लक्ष झाले. स्थानिकांच्या विरोधाला आमदार गायकवाड यांच्या विरोधामुळे बळ मिळाले. स्थानिक नागरिक, राजकीय पक्ष यांचे चर्चेतून समाधान करण्याची अट गायकवाड यांनी घातली होती.
आयुक्त डॉ. दयानिधी यांच्यासोबत उपायुक्त मदन सोंडे, आरोग्य अधिकारी मनीष हिवाळे, मुख्य स्वच्छता निरीक्षक विनोद केने, एकनाथ पवार हे होते. म्हारळ गावाशेजारील राणा खदान येथील डम्पिंगचे सपाटीकरण व कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचे काम गेल्या तीन वर्षांपासून सुरू आहे.
...........