उल्हासनगर : शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात डॉ. राजा दयानिधी यांना चांगले यश लाभले असले तरी पाणीटंचाई, पाणीचोरी रोखणे, अवैध बांधकामांना प्रभावीपणे आळा घालणे आदी समस्यांच्या हाताळणीत दयानिधी यांना अपयश आल्याने त्यांची बदली केली जाण्याची चर्चा सुरू झाली आहे.
देशातील सर्वाधिक घनतेच्या उल्हासनगर शहराला कोरोना संसर्गापासून वाचविण्यासाठी तत्कालीन आयुक्त सुधाकर देशमुख यांनी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, त्यांच्या बदलीनंतर कोरोना संख्येत झपाट्याने वाढ होऊ लागली. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने आयएएस दर्जाचे डॉ. राजा दयानिधी यांची आयुक्तपदी नियुक्ती केली. त्यानंतर कोरोनाची संख्या आटोक्यात आली असली तरी, आयुक्तांच्या कार्यपद्धतीवर सर्व स्तरातून टीका होत आहे. शहरात पाणीटंचाईची समस्या ‘जैसे थे’ असून, पाणी गळती थांबता थांबत नाही. महापालिकेच्या सर्वच विभागांत गोंधळाची स्थिती निर्माण झाल्याची टीका सत्ताधारी शिवसेना व आघाडीतील मित्रपक्षाकडून होत आहे. अवैध बांधकामावर कारवाई होण्याऐवजी प्रभाग अधिकाऱ्यांच्या फक्त बदल्या होत आहेत. मालमत्ता कर व पाणीपुरवठा विभागासाठी अभय योजना लावूनही वसुली नाही. एकूणच महापालिका आर्थिक संकटात सापडली आहे.
आयुक्त डॉ. दयानिधी यापूर्वीच्या आयुक्तांप्रमाणे शहराचा पाहणी दौरा का करीत नाही, असा प्रश्न विचारला जात आहे, तसेच आयुक्त काही मोजके अपवाद सोडल्यास नगरसेवक, नागरिक व पत्रकारांना भेटत नाहीत. त्यामुळे आयुक्तांसोबत मोठ्या वर्गाचा संवाद नाही. सत्ताधारी व विरोधी पक्षाचे नेते ‘आयुक्त बदला, शहर वाचवा’ अशी प्रतिक्रिया खाजगीत देत आहेत. जिल्हास्तरीय नेत्यांकडे आयुक्त बदलाची मागणी केली आहे, अशी चर्चा आहे. नवी मुंबईचे अतिरिक्त आयुक्त संजय काकडे यांची आयुक्तपदी निवड होणार आहे, असे संदेश सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. याबाबत आयुक्त डॉ. दयानिधी यांच्या सोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न करूनही तो झाला नाही.
..........