उल्हासनगर : महापालिका आयुक्त डॉ राजा दयानिधी यांनी सोमवारी प्रभाग समिती निहाय नगरसेवकां सोबत ऑनलाईन चर्चा करून कोरोना चाचणी केंद्र शहरात आणण्याचा मानस व्यक्त केला. तसेच संधूसाधू डॉक्टर विरोधात भरारी पथकाच्या तक्रारीनंतर कारवाई करण्याचे संकेत दिले आहे.
उल्हासनगरात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पालिका आयुक्तांनी सोमवारी प्रभाग निहाय नगरसेवकांना सोबत चर्चा केली. यावेळी महापालिका काय तयारी करीत आहे. याबाबतची माहिती आयुक्तांनी दिली. कॅम्प नं-५ येथील तहसील कार्यालयाच्या नवीन इमारती मध्ये १५० बेडचे विलागीकरण केंद्र उभारले असून पालिका टाऊन हॉलमध्ये व्हेंटिलेटर युक्त अतिदक्षता विभाग उभारणार असल्याची माहिती दिली. तसेच खाजगी शाळा व सत्सांगची जागाही ताब्यात घेणार असल्याची माहिती दिली. आयुक्तांनी स्वतःहून ऑन लाईन नगरसेवकां सोबत चर्चा केल्याने नगरसेवकांनी अनेक सूचना आयुक्त यांना केल्या आहे. खाजगी रुग्णालयातील ८० टक्के बेड आरक्षित केल्यानंतर खाजगी डॉक्टर रुग्णावर उपचार करण्यास नकार देत आहेत. याप्रकाराने अनेकांचे जीव गेल्याचे महापालिका सभागृह नेते व शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी आयुक्तांच्या लक्षात आणून दिले.
शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी व कोविड चाचण्या वाढविण्यासाठी कोरोना चाचणी केंद्र शहरात आणण्याचा मानस आयुक्तांनी व्यक्त केला. चाचणी केंद्र शहरात सुरू झाल्यावर काही तासात कोरोना रुग्णांचा स्वाब अहवाल येवून पोझीटीव्ह रुग्णावर उपचार करण्यास दिरंगाई होणार नाही. असेही आयुक्त म्हणाले. महापालिकेने उभारलेल्या कोविड रुग्णालयात तसेच विलागिकरन केंद्रात व खाजगी रुग्णालयात किती बेड कोरोना रुग्णासाठी उपलब्ध आहेत. आदीची माहिती दिली. तसेच खाजगी रुग्णालयात नजर ठेवण्यासाठी भरारी पथकाची स्थापना केल्याचे आयुक्त म्हणाले. सर्वपक्षीय नगरसेवक सोबत चर्चा करून महापालिका करीत असलेल्या कामाची माहिती दिल्याने नगरसेवकांनी आयुक्तांच्या कामावर समाधान व्यक्त केले.
खाजगी रुग्णालयात कारवाई नाही.
महापालिका आयुक्तांनी रुग्णावर उपचार करण्यास नकार देणाऱ्या खाजगी रुग्णालयावर कारवाई करण्याचे आदेश गेल्या आठवड्यात काढले. मात्र आयुक्तांच्या आदेशाला रुग्णालये केराची टोपली दाखविल्यांचे चित्र शहरात आहे. कोरोणच्या भीतीने रुग्णालय रुग्णावर उपचार करीत नसल्याने अनेकांचा बळी गेला असून कारवाईची मागणी बहुतांश नगरसेवकांना केली आहे.