सदानंद नाईक उल्हासनगर : महापालिका डॉ. आंबेडकर अभ्यासिकेत १०० बेडचे कोरोना रुग्णालय उभारले असून, आयुक्त समीर उन्हाळे यांनी रुग्णालयाची रविवारी पाहणी केली. तसेच उल्हासनगर आयटीआय कॉलेजमध्ये ६० बेडचे कोरोना रुग्णालय उभारले जात असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली आहे. उल्हासनगरात कोरोना रुग्णाची संख्या साडे तीनशे झाली असून, पूर्व व पश्चिम येथील कोरोना रुग्णालयात बेडची संख्या वाढूनही जागा अपुरी पडत आहे. अखेर आयुक्त समीर उन्हाळे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर दुमजली अभ्यासिकेचे रुपांतर कोरोना रुग्णालयात केले.१०० बेडसह अध्यावत यंत्रसामुग्री, डॉक्टर, नर्स, वॉर्ड बॉय आदीसह इतर कर्मचाऱ्याच्या नियुक्त्या केल्या आहेत. सोमवार पासून रुग्णालय सुरु होण्याचे संकेत आयुक्त समीर उन्हाळे यांनी दिले. रविवारी आयुक्त समीर उन्हाळे यांनी वैद्यकिय अधिकारी डॉ सुहास मोहनालकर, डॉ. राजा रिजवाणी, सहायक आयुक्त गणेश शिंपी, मुख्य स्वच्छता निरीक्षक विनोद केणी आदींनी डॉ आंबेडकर अभ्यासिकेतील कोरोना रुग्णालयाला भेट देऊन पाहणी केली आहे. दरम्यान कॅम्प नं ३ येथील उल्हासनगर आयटीआय कॉलेज मध्ये ६० बेडचे कोरोना रुग्णालय उभारण्याचे काम महापालिकेने सुरू केले.रुग्णाच्या उपचारासाठी खाजगी रुग्णालय व सोयीस्कर जागा ताब्यात घेण्याचे संकेत आयुक्तांनी दिले आहे. महापालिकेचा टाऊन हॉल ताब्यात घेऊन त्या ठिकाणी कोरोना रुग्णालय व विलगीकरण केंद्र सुरू करण्याचे निवेदन विविध राजकीय पक्षांनी पालिका आयुक्तांना दिले आहे. आयुक्तांनी शहरातील नाले सफाईची पाहणी करून अधिकाऱ्यांना काही सूचना दिल्या आहे.
उल्हासनगर महापालिका डॉ. आंबेडकर अभ्यासिकेत उभारले अद्ययावत १०० बेडचे कोरोना रुग्णालय
By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2020 7:40 PM