- सदानंद नाईक
उल्हासनगर : महापालिका जनसंपर्क अधिकारी युवराज भदाणे याने जन्मतारखेत फेरफार करून महापालिकेची फसवणूक केल्याचा ठपका चौकशी समितीने ठेवला. त्यानुसार भदाणे याच्यावर गुन्हा दाखल करण्याचा प्रस्तावाला शुक्रवारच्या महासभेत ठरावाला मंजुरी मिळाली. याबाबत उपोषण व पाठपुरावा करणारे दिलीप मालवणकर व रामेश्वर गवई यांनी समाधान व्यक्त करून नगरसेवकांचे आभार व्यक्त केले.
उल्हासनगर महापालिकेचे वादग्रस्त जनसंपर्क अधिकारी युवराज भदाणे यांची जन्मतारीख बोगस व बनावट असल्याचा आरोप जेष्ठ पत्रकार दिलीप मालवणकर यांनी आयुक्तांकडे लेखी केल्यावर आयुक्तांनी याबाबत चौकशी समिती नियुक्ती केली. चौकशी समितीच्या अहवालात भदाणे याने जन्मतारीख प्रमाणपत्रातील जन्मतारखेत फेरफार करून १ जून १९७२ केल्याचे नमूद केले.
शाळा सोडण्याच्या प्रमाणपत्रावर जन्मतारीख १ जून १९७० असून त्यांला महात्मा गांधी विद्यालय व आरकेटी महाविद्यालयाने पुष्टी दिली होती. तसेच त्याने आणलेली पीएचडी पदवी बोगस असल्याचे यापूर्वीच उघड झाले. चौकशी समितीच्या ११५ पानी अहवालानुसार आयुक्त डॉ राजा दयानिधी यांनी आदेश काढून भदाणे यांने मांडलेले सर्व मुद्दे फेटाळून लावले.
महापालिका आयुक्तांच्या आदेशानुसार महासभेत भदाणे यांच्यावर जन्मतारखेत फेरफार केल्याचा ठपका ठेऊन महापालिकेची फसवणूक केल्या प्रकरणी गुन्हे दाखल करण्याचा प्रस्ताव महासभेत आणण्यात आला. महासभेत आलेल्या प्रस्तावाला बहुतांश नगरसेवकांनी पाठींबा दिल्याने प्रस्ताव बहुमताने मंजूर झाला.
भदाणे यांच्यावर गुन्हे दाखल होऊन कारवाई होण्यासाठी जेष्ठ पत्रकार व समाजसेवक दिलीप मालवणकर, रामेश्वर गवई यांनी अनेकदा उपोषण केले. शुक्रवारी देखील त्यांनी लाक्षणिक उपोषण केले होते. भदाणे यांच्यावर अनेक गुन्हे दाखल असून नेहमी वादग्रस्त अधिकारी राहिला आहे. भदाणे यांच्यावर अनेक तक्रारी असून त्याच्या नेहमी पाठीमागे राहत असलेल्या नगरसेवकांनी त्याची जागा दाखवून दिली.
महापालिकेचे अधिकरी पोलीस ठाण्यात
महापालिका महासभेत भदाणे यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचा प्रस्ताव मंजूर झाल्यावर, महापालिका अधिकारी भदाणे यांच्यावर गुन्हे दाखल करण्यासाठी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गेल्याची माहिती महापालिका उपायुक्त (मुख्यालय) अशोक नाईकवाडे यांनी दिली. भदाणे यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यावर अटक करण्याचे संकेत पोलीस अधिकारी यांनी दिले आहे.