सदानंद नाईक उल्हासनगर : अखेर.....अवैध बांधकामे व त्या संबंधित तक्रारीची दखल महापालिका उपायुक्त मदन सोंडे यांनी घेऊन प्रभाग अधिकाऱ्यांना अवैध बांधकामाची यादी मागविल्याची माहिती दिली. याप्रकाराने प्रभाग अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले असून आयुक्तांच्या कारवाई आदेशकडे सर्वांचें लक्ष लागले आहे.
उल्हासनगरात सर्रासपणे बहुमजली आरसीसीचे अवैध बांधकामे सर्रासपणे सुरू असून महापालिका कारवाई करीत नसल्याने सर्वस्तरातून टीकेची झोळ उठली. त्यानंतर आयुक्त डॉ राजा दयानिधी यांनी अनाधिकृत बांधकाम नियंत्रक पद रद्द करून अवैध बांधकामाला संबंधित प्रभाग अधिकाऱयांना जबाबदार धरण्याचे आदेश काढले. तसेच प्रभाग अधिकारी अवैध बांधकामाची यादी उपायुक्तांना दिल्यावर, अतिरिक्त आयुक्ता मार्फत सदर माहिती आयुक्ता पर्यंत येणार, असे आदेशात म्हटले होते. मात्र आयुक्तांच्या आदेशनानंतरही प्रभाग अधिकाऱ्यांनी अवैध बांधकामाचा अहवाल उपायुक्तांना दिला नाही. दरम्यान महापौर लिलाबाई अशान यांनीही आयुक्त डॉ राजा दयानिधी यांना अवैध बांधकामाची दखल घेण्याची विनंती केली.
अखेर उपायुक्त मदन सोंडे यांनी प्रभाग अधिकाऱ्यांना लेखी आपआपल्या क्षेत्रातील अवैध बांधकामाची यादी मागविली आहे. उपायुक्तांच्या पत्राने प्रभाग अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. बांधकामाला स्थानिक नगरसेवक राजकीय नेत्यांच्या आशीर्वाद असल्याने, आयुक्तांसह संबंधित अधिकाऱ्यावर राजकीय दबाव वाढल्याची चर्चा शहरात होत आहे. अवैध बांधकामाची यादी व आलेल्या तक्रारीची दखल महापालिका घेणार असल्याची प्रतिक्रिया उपायुक्त सोंडे यांनी दिली. मात्र अवैध बांधकामावर कागदावर कारवाई होणार असून पूर्वीच्या बांधकामा प्रमाणे यांनाही अभय मिळणार असल्याची टीका होत आहे.
राणा डम्पिंग ग्राऊंड येथे अवैध बांधकामे
महापालिकेच्या राणा डॉम्पिंग ग्राऊंड परिसरातील खुल्या जागेवर सर्रासपणे अतिक्रमण होत आहे. त्यातील काही ठिकाणी आरसीसीचे अवैध बांधकामे होत असून महापालिकेने बघ्याची भूमिका घेतली. अशी टीका स्थानिकांनी केली. महापालिकेने कोणाच्या दबावाखाली अवैध बांधकामावरील पाडकाम कारवाई बंद केली. असा प्रश्न स्थानिकांनी केली.