उल्हासनगर : जिल्हा डीपीडीसी बैठकीत आमदार कुमार आयलानी यांनी महापालिका इमारत धोकादायक असल्याचे सांगून पुनर्बांधणीची मागणी केली. महापालिका मुख्यालय इमारती मध्ये शेकडो जणांची वर्दळ असून नवीन इमारत बांधणीसाठी शासनाकडे ८० कोटीच्या निधीची मागणी केल्याची माहिती आयुक्त अजीज शेख व उपायुक्त अशोक नाईकवाडे यांनी दिली आहे.
उल्हासनगर महापालिका मुख्यालय इमारत ४० वर्षा पेक्षा जुनी असून गेल्या वर्षी इमारती स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले. ऑडिट मध्ये इमारत धोकादायक दाखवून दुरुस्तीचा सल्ला देण्यात आला. भविष्यात नवीन महापालिका मुख्यालय इमारतीसाठी महापालिकेने राज्य शासनाकडे ८० कोटीच्या निधीची मागणी केल्याची महिती आयुक्त अजीज शेख व उपायुक्त अशोक नाईकवाडे यांनी दिली.
दरम्यान पालकमंत्री संभुराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या डीपीसीडी बैठकीत आमदार कुमार आयलानी यांनी महापालिका इमारत धोकादायक असल्याचे सांगून खळबळ उडून दिली. तसेच नवीन महापालिका मुख्यालय इमारतीसाठी भरीव निधीची मागणी केली. याव्यतिरिक्त आमदार आयलानी यांनी शहरातील विविध विकासकामे करणे, म्हारळ, वरप व कांबागाव येथील विविध विकास कामे, मध्यवर्ती हॉस्पिटलची दुरुस्ती आणि त्यातील रिक्त पदे भरण्याचीही मागणी केली. आयलानी यांच्या पावित्र्याने महापालिका इमारतीचा प्रश्न ऐरणीवर आला असून नवीन मुख्यालय इमारतीची चर्चा महापालिका वर्तुळात रंगली आहे.
आमदार कुमार आयलानी यांनी गेल्या महिन्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन शहरातील विविध विकास कामासह धोकादायक इमारतीच्या पुनर्बांधणी बाबत लवकर निर्णय घेण्याची विनंती केली होती. मात्र त्यांच्या मागणीला केराची टोपली दाखवली जात का? असा प्रश्न विचारला जात आहे. डीपीडीसी बैठकीत आयलानी यांनी उल्हासनगर मतदारसंघ अंतर्गत येणाऱ्या ग्रामीण भागासाठी विधुतीकरण करणे, गार्डन सुशोभिकरण करने, शहरातील प्रमुख मोठे नाले यांचे बांधकाम, रस्ते पुनर्बांधणी करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी जिल्ह्याचे पालकमंत्री शंभुराजे देसाई यांच्याकडे केली.
मुख्यालय इमारत उभी राहणार?
महापालिका मुख्यालय इमारती मागील भागात तरण तलाव, जुने जकात कार्यालय व अग्निशमन विभागाचे कार्यालय आहे. या मोठ्या जागेत महापालिकेची नवीन प्रशासकीय इमारतीचा प्रस्ताव आहे. त्यासाठी महापालिकेने राज्य शासनाकडे ८० कोटींची मागणी प्रस्तावाद्वारे केल्याची माहिती आयुक्त अजीज शेख व उपायुक्त अशोक नाईकवाडे यांनी दिली.