उल्हासनगर - महापालिकेने बालदिनाचे औचित्य साधून संकल्प निरोगी बालकत्वाचा' या उपक्रमा अंतर्गत शहरातील विविध शाळेतील १५ हजार पेक्षा जास्त मुलांनी सहभाग नोंदविल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर, उपायुक्त सुभाष जाधव, संगीता लहाने यांनी दिली. सोमवारी बालदिनी यातून सर्वोकृष्ठ १८ मुलाची निवड करण्यात आली आहे.
उल्हासनगर महापालिका आयुक्त पदी अजीज शेख यांची निवड झाल्यांनंतर त्यांनी विविध उपक्रम राबविण्यास सुरुवात केली. महापालिकेच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून सांस्कृतिक कार्यक्रमासह विविध स्पर्धेचे आयोजन केल्याने, शहरातून त्यांचे कौतुक झाले. देशाचे पाहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त देशात बालदिन साजरा केला जातो. महापालिका आयुक्त अजीज शेख यांच्या संकल्पनेतून 'संकल्प निरोगी बालकत्वाचा' या अभियानांतर्गत शाळा परिसर स्वच्छता व आरोग्य तपासणी सोबतच महापालिकेने निबंध, वक्तृत्व व चित्रकला स्पर्धाचे आयोजन केले होते.
शहरातील ११८ शाळांतील प्राथमिक आणि माध्यमिक स्तरावरील १५ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी महापालिकेच्या उपक्रमात सहभाग नोंदवला. सोमवारी १४ नोव्हेंबर रोजी बालदिनी स्पर्धेची अंतिम फेरी झाली असून त्यातून सर्वोत्कृष्ट १८ विद्यार्थ्यांची निवड घोषित केली. 'संकल्प निरोगी बालकत्वाचा' या उपक्रमांतर्गत १० नोव्हेंबर रोजी स्पर्धांची पहिली फेरी शाळा स्तरावर घेण्यात आली. स्पर्धेत प्राथमिक विभागातून निबंध स्पर्धेत ५ हजार १३, वक्तृत्व स्पर्धेत ४ हजार ३३१ आणि चित्रकला स्पर्धेत ५७५३ विद्यार्थ्यांनी भाग घेतला. माध्यमिक विभागातून निबंध स्पर्धेत १८६१, वक्तृत्व स्पर्धेत १२८९ आणि चित्रकला स्पर्धेत १८१९ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. तर दुसऱ्या फेरीत ११ नोव्हेंबर रोजी समूह साधन केंद्र स्तरावर घेण्यात आली व आता अंतिम फेरी सोमवारी १४ नोव्हेंबरला उल्हासनगर पश्चिमेकडील छत्रपती शाहू महाराज विद्यालय व डॉ बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिकेत झाली आहे. महानगरपालिकेने आयोजित केलेल्या बालमहोत्सवाला शहरातील शाळांनी दिलेला प्रतिसाद जोरदार असून त्यामुळे प्रोत्साहित होऊन शालेय विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम पुढेही राबवण्यात येणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांनी सांगितले.