सदानंद नाईक, उल्हासनगर: महापालिका आरक्षण सोडत प्रक्रियेत तांत्रिक त्रुटी असल्याचा ठपका निवडणूक आयोगाने ठेवून पुन्हा सर्वसाधारण प्रवर्गातील महिला आरक्षण सोडत काढण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार महापालिका आयुक्त अजीज शेख, अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांच्या उपस्थितीत बुधवारी सकाळी वाजता पुन्हा आरक्षण सोडत काढण्यात आली आहे.
उल्हासनगर महापालिकेने सुरवातीला ओबीसी आरक्षण विना निवडणूक आरक्षण सोडत काढली. त्यानंतर निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार ८९ पैकी २४ ओबीसी जागेसाठी २९ जुलै रोजी आरक्षण सोडत काढली. आरक्षण सोडत मध्ये प्रभाग क्रं-६ व २८ मध्ये तिन्ही जागा महिलांसाठी आरक्षित झाल्या. या आरक्षणावर अनेकांनी आक्षेप नोंदविले होते. नियमानुसार तीन सदस्यीय प्रभाग मध्ये जास्तीत जास्त दोन जागा महिलांसाठी आरक्षित असणे गरजेचे आहे. मात्र सोडती मध्ये दोन प्रभागातील तिन्ही जागा महिलासाठी आरक्षित ठेवण्यात आल्या होत्या. महापालिकेने गेल्या आठवड्यात ओबीसी आरक्षण सोडत प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर, निवडणूक आयोगाकडे अहवाल सादर केला. राज्य निवडणूक आयोगाने महापालिकेच्या अहवालात तांत्रिक त्रुटी असल्याचे सांगून सर्वसाधारण प्रवर्गातील महिला आरक्षण सोडत पुन्हा करण्याचे आदेश दिले.
निवडणुक आयोगाच्या आदेशानुसार ३ ऑगस्ट रोजी टाऊन हॉल मध्ये पुन्हा सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांचे आरक्षण सोडत आयुक्त अजीज शेख, अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर, निवडणूक अधिकारी मनीष हिवरे यांच्या उपस्थितीत काढण्यात आली. पुन्हा आरक्षण सोडतीत प्रभाग क्रं-६ व २८ मध्ये दोन महिला प्रवर्गासाठी तर एक सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षण पडले आहे. या सोडतीनंतर इच्छुकांनी समाधान व्यक्त केले असून अनेकांना सुरक्षित प्रभाग शोधण्याची वेळ आली. महापालिका निवडणुकीत एकूण ३० प्रभाग असून २९ प्रभाग ३ सदस्यीय तर एक प्रभाग दोन सदस्यीय आहे. यामधून एकून ८९ नगरसेवक निवडून येणार आहे. ८९ पैकी १५ जागा एससी साठी आरक्षित असून त्यापैकी ८ महिलांसाठी आरक्षित आहेत. तर १ जागा एसटी महिला प्रवर्गासाठी आरक्षित आहे. २४ ओबीसी जागे पैकी १२ महिलांसाठी आरक्षित आहेत. तर ४९ सर्वसाधारण जागे पैकी २४ जागा महिला प्रवर्गासाठी आरक्षित आहे.
चौकट
महापालिकेत येणार महिला राज
महापालिकेच्या एकून ८९ जागे पैकी ४५ जागा विविध प्रवर्गातील महिलासाठी आरक्षित आहेत. इतर प्रभागातूनही महिला नगरसेवक निवडून येणार असल्याने, महापालिकेत महिला राज येणार आहे.