- सदानंद नाईकउल्हासनगर : महापालिका नगररचनाकार, आरोग्य विभाग या महत्त्वाच्या विभागांचे कामकाज रामभरोसे सुरू आहे. आरोग्य विभागात वैद्यकीय अधिकारीच नसल्याने नागरिकांचे आरोग्य सांभाळणार कोण, असा प्रश्न प्रशासनाला सतावत आहे. तसेच नगररचना विभागासह इतर विभागांतही हीच स्थिती असून सुमारे एक हजार पदे रिक्त असल्याने महापालिकेचे कामकाज ठप्प पडण्याची नामुश्की ओढवण्याची भीती प्रशासनाकडून व्यक्त करण्यात येत आहे.
उल्हासनगर महापालिकेचे नगररचनाकार आणि वैद्यकीय अधिकारी ३१ जानेवारीला सेवानिवृत्त झाले आहेत. आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकारी डॉ. राजा रिजवानी, तर नगररचनाकार विभागातही मिलिंद सोनावणी हे सेवानियुक्त झाल्याने त्यांच्या समतुल्यपदच नाही. आयुक्त सुधाकर देशमुख यांनी राज्य शासनाकडे पाठपुरावा करून प्रतिनियुक्तीवर अधिकारी देण्याची मागणी केली आहे; मात्र अद्याप त्यावर अंमलबजावणी झालेली नाही.
महापालिकेत अतिरिक्त आयुक्तासह दोन उपायुक्त, सहा सहायक आयुक्त, एक नगररचनाकार, एक सहायक नगररचनाकार संचालक, एक निर्मिती नगररचनाकार, शहर अभियंता, तीन कार्यकारी अभियंता, एक करनिर्धारक, एक वैद्यकीय अधिकारी, एक विधी अधिकारी आदी वर्ग एक श्रेणीतील ८० टक्के पदे आणि इतर मंजूर पदांपैकी सुमारे एक हजार पदे रिक्त आहेत.
एकमेव डॉक्टर असलेले राजा रिजवानी यांच्याकडे प्रभारी वैद्यकीय अधिकारीपदाचा प्रभार होता. तेही निवृत्त झाले. मात्र, शासन प्रतिनियुक्तीवरही पदे भरत नसल्याने शहराचा कारभार कसा सांभाळायचा, असा पेच प्रशासनाला पडला आहे.
...तर नागरिकांच्या रोषाला तोंड द्यावे लागेल!
वैद्यकीय अधिकारी डॉ. राजा रिजवानी सेवानिवृत्त झाल्यानंतर विभागाचा प्रभारी पदभार देण्यासाठी एकही डॉक्टर पालिकेकडे नाही. साथीच्या आजारांवर नियंत्रण ठेवणार कोण? असा प्रश्न प्रशासनाला भेडसावत असून विभागाचे काम ठप्प पडण्याची भीती आयुक्त सुधाकर देशमुख यांनी व्यक्त केली. तर, जन्ममृत्यूच्या दाखल्यांसह विभागाचे वैद्यकीय कामकाज ठप्प पडून नागरिकांचा रोष ओढवणार असल्याचे उपायुक्त संतोष देहरकर यांनी सांगितले.