उल्हासनगर : महापालिकेच्या गुरुवारी होणाऱ्या महासभेत मालमत्ताकरात १२ व ७ टक्के सवलत देण्याचे संकेत भाजप नगरसेवकांनी दिले. तसेच लॉकडाऊनकाळात तीन महिन्यांपेक्षा जास्त काळ दुकाने बंद असल्याने त्यांचे तीन महिन्यांचे पाणीबिल माफ होण्याची शक्यता स्थायीचे सभापती राजेश वधारिया यांनी व्यक्त केली.
अंदाजपत्रकाबाबत महासभा होणार असून त्यापूर्वी भाजपचे गटनेते जमनुदास पुरस्वानी, विरोधी पक्षनेते किशोर वनवारी, नगरसेवक मनोज लासी, प्रदीप रामचंदानी आदींनी बैठक घेतली. नागरिकांना दिलासा देण्यासाठी मालमत्ताकरात ३१ डिसेंबरपर्यंत १२ तर १ जानेवारी ते ३१ मार्चदरम्यान सात टक्के सूट देण्याचा ठराव मांडण्याचे संकेत वधारिया यांनी दिले.
विरोधी पक्ष असलेल्या भाजपने मालमत्ताकर व दुकानदारांच्या पाणीबिलात सूट देण्याचे संकेत देत सत्ताधारी शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस, रिपाइं पक्ष यांच्यावर कुरघोडी केली आहे. या सभेत अतिक्रमण झालेला मनपा शाळेचा भूखंड, अंब्रोसिया हॉटेलजवळील आरक्षित भूखंड, स्वच्छतागृहावरील अतिक्रमण आदी विषयांवर चर्चा होणार आहे. तसेच कोरोना रुग्णांसाठी निकृष्ट दर्जाचे जेवण दिल्याने वादळी चर्चा होण्याची शक्यता आहे.
करातील सवलतीस मुदतवाढ
च्सध्याची कोविड परिस्थिती पाहता नागरिकांनी मालमत्ताकर आॅनलाइन भरावा. ज्या नागरिकांकडे आॅनलाइन भरणा करण्याची सुविधा नाही, त्यांनी नजीकच्या नागरी सुविधा केंद्रात कार्यालयीन वेळेत रोख अथवा धनादेशाद्वारे कराची रक्कम जमा करावी. रक्कम वेळेत जमा न केल्यास त्यावर दोन टक्के व्याज आकारले जाईल, असे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.