उल्हासनगर : स्थायी समितीत नवीन आठ सदस्यांची निवड गुरुवारी २ मे च्या महासभेत होणार आहे. सदस्यपदासाठी राजकीय पक्षांत चढाओढ सुरू असून सभापतीपद ओमी कलानी टीमकडे गेले आहे.उल्हासनगर महापालिका स्थायी समितीचे एकूण १६ पैकी आठ सदस्य १ एप्रिल रोजी निवृत्त झाले. मात्र, लोकसभा निवडणुकीमुळे नवीन सदस्यांची निवड लांबणीवर पडली होती. कोकण विभागीय आयुक्तांनी समिती सदस्यांच्या निवडीला हिरवा कंदील दिल्यावर २ मे रोजी दुपारी साडेबारा वाजता नवीन सदस्यांची निवड होणार आहे. स्थायी समितीत भाजप-ओमी टीमचे ७, शिवसेनेचे ५, साई पक्षाचे ३ व राष्ट्रवादीचा १ सदस्य असे एकूण १६ सदस्य आहेत. त्यापैकी भाजपचे जमनादास पुरस्वानी, जया माखिजा, चंद्रावती सिंग, पंचम कलानी, शिवसेनेचे धनंजय बोडारे, राजेंद्र चौधरी, पुष्पा बागुल व राष्ट्रवादीचे भरत गंगोत्री असे आठ सदस्य निवृत्त झाले. समिती सदस्यांसाठी वर्णी लावण्यासाठी विविध राजकीय पक्षांत चढाओढ लागली असून सभापतीपद सत्ताधारी आघाडीतील ओमी टीमकडे गेले आहे.महापालिकेतील पक्षांनुसार, नगरसेवक संख्येनुसार भाजप व शिवसेनेचे प्रत्येकी तीन, तर आरपीआय व राष्ट्रवादी पक्षाचा प्रत्येकी एक असे एकूण आठ सदस्य हे निवृत्त सदस्यांच्या जागी निवडून जाणार आहे. आरपीआय व पीआरपी पक्षांचे दोन व एक असे तीन नगरसेवक असून त्यांनी कोकण विभागीय आयुक्तांकडे एकत्र नोंदणी केल्याने त्यांचा एक सदस्य स्थायी समितीमध्ये जाणार आहे. तर, भाजपचा एक सदस्य कमी होणार आहे.सभापतीपदावरून वादाला सुरुवातलोकसभा निवडणुकीदरम्यान विरोधी बाकावरील शिवसेना व भाजप एकत्र आल्याने शहरातील सत्ताकारण बदलण्याची शक्यता निर्माण झाली. सद्य:स्थितीत पालिकेवर भाजप-ओमी टीम व साई पक्षाची सत्ता असून समिती सभापतीपद ओमी टीमकडे गेले आहे. सभापतीपदासाठी टीमकडून राजेश वधारिया यांचे नाव पुढे आले असून भाजपकडून निवडणुकीदरम्यान पक्षात प्रवेश करणाऱ्या एखाद्या सदस्याला देण्याची चर्चा सुरू आहे.
उल्हासनगर पालिकेत स्थायी सदस्यांसाठी राजकीय पक्षांत चढाओढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2019 2:07 AM