सदानंद नाईक
लोकमत न्यूज नेटवर्क
उल्हासनगर : महापालिकेत उत्पन्नाचा ठणठणाट असताना गेल्या पाच महिन्यांत विविध विभागातील १५३ कोटींच्या कामाचे प्रस्ताव आले. यामध्ये बांधकाम व पाणी पुरवठा विभागाने आघाडी घेतली असून, आयुक्तांनी वेळीच लक्ष देण्याची गरज आहे.
उल्हासनगर महापालिकेच्या कारभारावर आमदनी अठ्ठन्नी, खर्चा रुपया, अशी टीका होत असताना, गेल्या पाच महिन्यांत १५३ कोटींच्या कामाचे प्रस्ताव आले आहेत. या प्रकाराने महापालिकेच्या कारभारावर सर्वस्तरातून टीकेची झोड उठत आहे. महापालिका आयुक्त डॉ. राजा दयानिधी, अतिरिक्त आयुक्त करुणा जुईकर, उपायुक्त अशोक नाईकवाडे, मुख्य लेखाधिकारी विकास चव्हाण, महापौर लीलाबाई अशान, उपमहापौर भगवान भालेराव, स्थायी समिती सभापती टोनी सिरवानी, विरोधी पक्षनेते किशोर वनवारी, आदींनी लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. एप्रिल ते ऑगस्ट या पाच महिन्यांत बांधकाम विभागात ९८ कोटींच्या विकासकामांचे प्रस्ताव आले. त्यापाठोपाठ पाणी पुरवठा विभाग २९ कोटी, विद्युत विभाग ८ कोटी, वाहन विभाग २ कोटी, नागरी आरोग्य केंद्र २ कोटी ६० लाख, वैद्यकीय आरोग्य विभाग ७ कोटी असे एकूण १५३ कोटींच्या विकासकामांचे प्रस्ताव विविध विभागात आले आहेत.
पाच महिन्यांत मालमत्ता कर विभागाकडून २३ कोटी व नगररचनाकार विभागाकडून ११ कोटी असे एकूण ३५ कोटींचे उत्पन्न आले आहे. उत्पन्न व खर्चातील तफावत दूर करण्यासाठी आयुक्त डॉ. राजा दयानिधी यांनी वेळीच विकासकामांच्या प्रस्तावावर नियंत्रण ठेवले नाही तर महापालिकेची आर्थिक स्थिती डबघाईला येण्याचे संकेत तज्ज्ञांनी दिले. याबाबत मुख्य लेखा अधिकारी विकास चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता, विविध विभागातील विकासकामांचे प्रस्ताव आले असल्याचे सांगून अधिक बोलण्यास नकार दिला. दरम्यान, नागरी आरोग्य केंद्राचा ठेकेदार व सल्लागार एकच असल्याची चर्चाही महापालिकेत रंगली आहे.