सदानंद नाईक ,उल्हासनगर : महापालिकेने शनिवारी आयोजित केलेल्या लोकन्यायालयात अभय योजनेखाली ११ कोटी ४४ लाखाची वसुली झाली. मालमत्ता कर बिलावर थकीत व्याज माफ करण्यासाठी महापालिकेत सही शिक्का घेण्यासाठी जावे लागत असल्याने, नागरिकांची तारांबळ उडाली. परिणामी अनेकांनी थकीत मालमत्ता कर भरण्याचे टाळले असल्याचे बोलले जात होते.
उल्हासनगर महापालिकेने आयोजित केलेल्या लोकन्यायालयात मालमत्ता करावरील विलंब शास्ती माफ करणे, मालमत्तांचे कर निर्धारण व कर आकारणी संदर्भात वाद असलेली प्रकरणे, दुबार नोंद व इतर कारणास्तव असलेल्या नोंदी रदद करुन त्यावरील कर आकारणी निर्लेखित करणे. या प्रकरणांचा निपटारा अभय योजने अंतर्गत करण्यात येणार आहे. गेल्या सप्टेंबर महिन्यात महापालिकेने अभय योजनेचे आयोजन लोकन्यायालाय अंतर्गत केले होते. त्यातून साडे अकरा कोटी रुपयांची वसूली झाली होती. मात्र यावर्षीच्या गेल्या ९ महिन्यात मालमत्ता कराची एकून ५३ कोटीची वसुली झाली. यावर्षी १०० कोटीचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी, शनिवारी अभय योजने अंतर्गत लोकन्यायालयाचे आयोजन केले होते. लो
कन्यायालय अंतर्गत अभय योजनेत एकून ४ हजार ९६४ मालमत्ताधारकांनी मालमत्ता कर बिल अदा केले. एका दिवशी ११ कोटी ४४ लाखाची वसुली झाली असून या रक्कमेत २ कोटी ६९ लाख धनादेशाद्वारे मिळाले. अशी माहिती अतिरिक्त आयुक्त जमीर।लेंगरेकर यांनी दिली. मालमत्ता कर विभागाच्या उपायुक्त प्रियंका राजपूत, कर निर्धरक व संकलक जेठानंद करमचंदानी यांच्या टीमच्या प्रयत्नमुळे साडे अकरा कोटींची रक्कम एका दिवसात वसुल झाली आहे.
महापालिका मालमत्ता कर विभागाने दोन वर्षांपूर्वी ११० कोटीचा वसूलीचा आकडा गाठला होता. मात्र गेल्या वर्षी फक्त निम्म म्हणजे एकून ६४ कोटींची वसुली झाली होती. या कामी वसुलीमुळे विभागावर सर्वस्तरातून टीका झाली होती. यावर्षी पुन्हा मालमत्ता कर विभागाने कंबर कसली असून १०० कोटीचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी विविध उपाययोजना करीत आहे. या वर्षाच्या ९ महिन्यात ५३ कोटीची वसुली झालीं असून शनिवारच्या अभय योजने अंतर्गत साडे अकरा कोटी महापालिका तिजोरीत जमा झाले आहेत.
मार्च महिना अखेर पर्यंत १०० कोटीचा वसुली आकडा गाठावा लागणार आहे. मोठ्या थकबाकीधारकावर नोटिसा, मालमत्तेची जप्ती, लिलाव आदींच्या कारवाईचे संकेत मालमत्ता कर विभागाने दिले आहे.