उल्हासनगर: शहरातील तुंबलेल्या भुयारी गटारांची साफसफाई सफाई कामगारां ऐवजी रोबोटद्वारे करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. यापूर्वी महापालिकेने सीएसआर निधीतून २ रोबोट खरेदी केले असून शुक्रवारी तिसऱ्या रोबोटचे लोकार्पण आयुक्त अजीज शेख यांच्या उपस्थितीत झाले.
उल्हासनगरातील भुयारी गटारीची क्षमता संपल्याने, अनेक ठिकाणी भुयारी गटारी तुंबून गटारीतील सांडपाणी रस्त्यावरून वाहताना दिसते. केंद्र व राज्य शासनाच्या अमृत योजनेच्या तिसऱ्या टप्प्यात ४०० कोटी पेक्षा जास्त निधीतून शहर अंतर्गत भुयारी गटारीचे काम सुरू होणार आहे. तोपर्यंत भुयारी गटारांची साफसफाई करण्यासाठी रोबोटचा उपयोग करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला. मोठ्या कंपनीच्या सीएसआर निधीतून महापालिकेने दोन रोबोट यापूर्वीच खरेदी केले असून रोबोटद्वारे भुयारी गटारीची सफाई केली जात आहे. त्यामुळे तुंबलेल्या गटारी पासून नागरिकांना काहीप्रमाणात दिलासा मिळाला आहे. दरम्यान महापालिकेने टाटा ट्रस्टकडे सीएसआर निधी बाबत पाठपुरावा केल्यानंतर टाटा ट्रस्टने सीएसआर निधीतून महापालिकेला शुक्रवारी तिसरा रोबोट दिला असून आयुक्त अजीज शेख यांच्या हस्ते रोबोट कार्यान्वित केला.
शहरातील भुयारी गटारांची साफसफाई यापूर्वी कामगाराद्वारे केली जात होती. भुयारी गटारीची सफाई करते वेळी गुदमरून कामगारांचे मृत्यू झाल्याच्या घटना इतर महापालिकेत घडल्या आहेत. तसा प्रकार टाळण्यासाठी महापालिकेने भुयारी गटारांची साफसफाई रोबोटद्वारे करण्याचा निर्णय घेऊन सीएसआर निधीतून दोन रोबोट यापूर्वीच महापालिका आरोग्य विभागाच्या दिमतीला आहेत. टाटा ट्रस्टच्या सीएसआर निधीतून मिळालेल्या रोबोट शुक्रवारी आयुक्त शेख यांच्या हस्ते कार्यान्वित केला. यावेळी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर, करूणा जुईकर, उपायुक्त अशोक नाईकवाडे, अभियंता दिलीप वानखेडे, बी.एस.पाटील व टाटा ट्रस्टच्या ऑंड्रीला रॉय आदीजन उपस्थित होते.