उल्हासनगर : शहरातून जाणाऱ्या कल्याण ते अंबरनाथ रस्त्यावर कार बाजार व गॅरेजवाले दुकानदार यांनी मुख्य रस्त्याला लागून गाड्या उभ्या केल्याप्रकरणी महापालिकेने धडक कारवाई केली. कारवाईत अनेक साहित्य जप्त केले असून २० हजाराचा दंड ठोठावल्याची माहिती सहायक आयुक्त गणेश शिंपी यांनी दिली.
उल्हासनगरातून जाणाऱ्या कल्याण ते अंबरनाथ मुख्य रस्त्यावर गाड्यांचे गॅरेज दुकान व कार बाजार प्रसिद्ध आहे. कार बाजार व गॅरेज दुकानदार मुख्य रस्त्यालगत धोकादायक स्थितीत गाड्या उभ्या केल्या जातात. महापालिकेने वेळोवेळी कारवाई करून परिस्थिती जैसे थी आहे. मंगळवारी दुपारी सहायक आयुक्त गणेश शिंपी यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रभाग समिती क्रं-२ चे प्रभाग अधिकारी तुषार सोनावणे व अतिक्रमण पथकाने रस्त्यावर असणाऱ्या गाड्यावर व साहित्यावर कारवाई केली. यावेळी विविध साहित्य जप्त करण्यात आले. तर कार बाजार व गॅरेज दुकानदार यांच्याकडून २० हजाराचा दंड वसूल केला. अशी माहिती सहायक आयुक्त व अतिक्रमण विभागाचे प्रमुख गणेश शिंपी यांनी दिली.
शहरातील रस्त्यावर धोकादायक स्थितीत उभ्या करण्यात येत असलेल्या वाहनासह हातगाड्यावर दोन दिवसांपूर्वी पोलिसांनी कारवाई केली होती. त्यानंतर महापालिकेला जाग येऊन कल्याण ते अंबरनाथ मुख्य रस्त्यावरील कार बाजार व गॅरेज दुकानदारांवर कार रस्त्यावर उभी केली व साहित्य रस्त्यावर ठेवल्या प्रकरणी दंडात्मक कारवाई केली. तसेच विविध साहित्य महापालिका अतिक्रमण पथकाने जप्त केले.कारवाई सुरूच ठेवण्याचे संकेत सहायक आयुक्त शिंपी यांनी दिले.