सदानंद नाईक, उल्हासनगर: शासनाने अभियंता, आरोग्य अधिकारी, अग्निशमन सुरक्षा रक्षक, विधुत मदतनीस, मोटरमन आदी विविध १५६ पदे भरण्याला मंजुरी दिली आहे. पदे भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असून पुढील महिन्यात जहिरात प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती उपायुक्त अशोक नाईकवाडे यांनी दिली आहे.
उल्हासनगर महापालिकेत अधिकाऱ्यांची ७० तर वर्ग-३ व ४ ची ४० टक्के पदे रिक्त आहेत. या रिक्त अधिकारी व कर्मचाऱ्यामुळे महापालिकेतील विकास कामावर परिणाम झाला असून विकास कामे पूर्ण करण्यासाठी ५५० पेक्षा जास्त कंत्राटी कर्मचाऱ्यांची भरती ठेकेदारा मार्फत महापालिकेने केली आहे. तसेच निवृत्त अधिकाऱ्यांची नियुक्ती तात्पुरत्या स्वरूपात केली आहे. महापालिका आयुक्त अजीज शेख यांनी तांत्रिक स्वरूपाचे विविध पदे भरण्यासाठी शासनाकडे मंजुरी मागितली. शासनाने सहानुभूती दाखवत १५६ पदे भरण्याला मंजुरी दिली. शासनाने मंजुरी देताच महापालिकेने विविध पदे भरण्याची प्रक्रिया सुरू केली. जानेवारी महिन्यात विविध पदाची जाहिरात प्रसिद्ध होणार असून येत्या दोन महिन्यात पदे भरली जाणार असल्याची माहिती उपायुक्त अशोक नाईकवाडे यांनी दिली आहे.
महापालिकेत कार्यकारी अभियंता, उपअभियंता, शाखा अभियंता, सहायक आयुक्त, अग्निशमन दलाचे सुरक्षा रक्षक, मोटर मदतनीस, तारतांत्री, विधुत मदतनीस, वैद्यकीय अधिकारी, उपकर निर्धारक, बाजार निरीक्षक, आरोग्य निरीक्षक, विजतंत्रि आदी एकून १५६ पदे भरण्यात येणार आहे. पदे भरण्यासाठी महापालिकेने एका कंपनीची नियुक्ती केली असून पुढील महिन्यात विविध पदासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे. तर जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर दोन महिन्यात पदे भरण्यात येणार आहे. याबाबतची माहिती महापालिका उपायुक्त अशोक नाईकवाडे यांनी दिली आहे. पदे भरल्यानंतर महापालिकेचा कारभार हाकलने सुरू होणार आहे. तसेच कंत्राटी पदे कमी होणार आहे.