उल्हासनगर : महापालिकेने पावसाळ्यापूर्वी खाजगी ठेकेदारा द्वारे लहान मोठ्या नाल्याची सफाई सुरू केली असून १५ जूनपर्यंत ९० टक्के नाले सफाई झाल्याचा दावा अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांनी केला. प्रत्यक्षात अनेक नाले तुंबलेले असल्याचे चित्र शहरात आहे.
उल्हासनगर महापालिका पावसाळ्यापूर्वी लहान मोठ्या नाल्याची सफाई करते. यावर्षी महापालिका प्रभाग क्रं-३ मधील साफसफाईचे खाजगीकरण केल्याने, त्या प्रभाग समिती व्यतिरिक्त इतर शहरातील ४६ मोठे नाले व ८८५ लहान नाले, कलवटे सफाई करण्याचे काम गेल्या महिन्याच्या तिसऱ्या आठवड्या पासून महापालिकेने खाजगी ठेकेदाराद्वारे सुरू केले होते. १५ जून पर्यंत १०० टक्के सफाईचे टार्गेट महापालिकेने ठेवले होते. अतिरिक्त आयुक्त जमीर।लेंगरेकर यांनी नाले सफाईचा आढावा घेतला. त्यावेळी त्यांनी ९० टक्के पेक्षा जास्त नाले सफाई झाल्याची माहिती दिली.
महापालिकेने ९० टक्के पेक्षा जास्त नाले सफाईचा दावा केला आहे. प्रत्यक्षात अनेक नाले प्लास्टिक पिशवीच्या तुंबल्याचे चित्र शहरात आहे. शहाड स्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्यातील नाल्यातील साचलेला गाळ शुक्रवारी काढण्यात आला. असाच गाळ इतर नाल्यात साचून असून पावसाळा सुरू होण्यापूर्वी वालधुनी नदी पात्रात साचलेला गाळ काढण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. तसेच लहान ८८५ नाले, कलवटे अद्यापही तुंबलेले असून पावसाळ्यात पाणी तुंबून वित्त व जीवितहानी होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.