उल्हासनगर : शहरातील अनेक इमारतींमध्ये पावसाचे पाणी गळत असताना खुद्द महापालिकेच्या इमारतीला गळती लागली आहे. महत्त्वाच्या कागदपत्रांबरोबरच वस्तू व फर्निचर खराब होण्याची शक्यता आहे. गळती लागल्यानंतर ऐन पावसाळ्यात पत्र्यांची शेड उभारण्याचे काम सुरू केले आहे.उल्हासनगर महापालिका मुख्यालय इमारत ५० वर्षे जुनी असून संपूर्ण इमारतीला गळती लागली आहे. गळतीने कागदपत्रे, संगणक, फॅन, झेरॉक्स मशीनसह फर्निचर खराब होण्याची तक्रार नगरसेवकांनी आयुक्तांकडे केली. त्यानंतर, इमारतीवर प्लास्टिक व पत्र्यांची शेड बसवण्याचे आदेश आयुक्त सुधाकर देशमुख यांनी संबंधित विभागाला दिले.इमारतीला दरवर्षी गळती लागते, हे माहीत असूनही पावसाळ्यापूर्वी इमारतीवर प्लास्टिक वा शेड का टाकली नाही, अशी विचारणा संबंधित विभागाला आयुक्तांनी केली. इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील शिवसेना गटनेते रमेश चव्हाण यांच्या कार्यालयाबरोबरच नगररचनाकार, परिवहन कार्यालय, पीआरपीचे गटनेते प्रमोद टाले, राष्ट्रवादीचे गटनेते भरत गंगोत्री यांच्या कार्यालयाला गळती लागली. कार्यालयातील संगणक, फर्निचर, रेकॉर्ड खराब झाले आहे. विविध विभागांतही गळती होत आहे.
उल्हासनगर पालिका मुख्यालयाला गळती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 07, 2019 11:02 PM