उल्हासनगर : महापालिका विकास कामाचे उद्घाटन व लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांच्या हस्ते होत असताना, दुसरीकडे गेल्या दोन वर्षांपासून उदघाटनाच्या प्रतिक्षेत असलेल्या महापालिका रुग्णालयासह अन्य वास्तूचे लोकार्पण कधी? असा प्रश्न विरोधी पक्षांनी केला. उदघाटनाच्या प्रतिक्षेत असलेल्या रुग्णालयातील कोट्यवधींची यंत्रसामग्री व साहित्य भंगाराच्या मार्गावर असल्याची टीका काँग्रेस पक्षाचे शहाराध्यक्ष रोहित साळवे यांनी केली.
उल्हासनगरातील विविध विकास कामाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते बुधवारी रात्री होणार आहे. मात्र दुसरीकडे महापालिकेने रिजेन्सी अंटेलिया येथे कोरोना काळात उभे केलेल्या २०० बेडचे महापालिका रुग्णालय, प्रांत कार्यालय व तहसील प्रांगणात उभारलेल्या प्रशासकीय इमारत, दसरा मैदानात उभारण्यात आलेले क्रीडा संकुल, सपना गार्डन येथील सिंधू भवन आदी वास्तूचे लोकार्पण कधी? असा प्रश्न विचारला जात आहे. महापालिकेने रुग्णालयासाठी खरेदी केलेले चढ्या किमतीतील कोट्यवधीं रुपयांचे साहित्य भंगारात निघण्याची भीती व्यक्त होत आहे.
दरम्यान, महापालिकेने खरेदी केलेली स्वीपिंग मशीन, स्ट्रीट लाईट गाडी, सेक्शन मशीन आदीचे लोकार्पण व श्वान निर्बिजीकरण केंद्र, शासकीय वाहनासाठी लागणारे चार्जिंग स्टेशन, खडेगोलावली येथिल मलनिस्सारण केंद्र, दिव्यानं व्यक्तीची ऑनलाईन सॉफ्टवेअर, प्लास्टिक क्रॅशर आदीचे ऑनलाईन उदघाटन मुख्यमंत्री यांच्या हस्ते होणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शहरात येणार असल्याने, सर्वाधिक दुर्लक्षित झालेल्या शांतीनगर डॉल्फिन रस्त्याची दुरुस्तीचे रातोरात महापालिकेने केले. तसेच अवैध ट्रक, टँकर ट्रमीनेर हटवून अवैध बांधकामावर कारवाई केली. रस्त्याची साफसफाई, चकाचक रस्ते, आदी कामाकडे महापालिका अधिकारी लक्ष देत आहेत. एकूणच शहराचे रुपडे पालटले आहे. मात्र कोरोना काळात नागरिकांच्या आरोग्यासाठी उभारलेल्या रिजेन्सी अंटेलिया येथील महापालिका सुसज्ज रुग्णालयासह अन्य वास्तूचे लोकार्पण लांबविण्याचे कारण काय? अशी टीकेची झोळ महापालिका प्रशासनावर होत आहे. रुग्णालयातील कोट्यवधींची मशीन, साहित्य भंगारात गेल्यावर रुग्णालयाचे लोकार्पण करणार का? असा प्रश्न यानिमित्ताने काँग्रेस पक्षासह अन्य राजकीय नेते विचारीत आहेत.
नागरिक आरोग्य सुविधेपासून वंचित
महापालिकेला आरोग्य सुविधेबाबत शासनाच्या मध्यवर्ती रुग्णालयावर अवलंबून राहावे लागत आहे. रिजेन्सी-अंटेलिया येथे बांधण्यात आलेले महापालिका रुग्णालयाचे लोकार्पण झाल्यास, हजारो नागरिकांना आरोग्य सुविधा मिळणार आहे. रुग्णालयाचे लोकार्पण लांबत असल्याने नागरिक आरोग्य सुविधेपासून वंचित राहत आहेत.