सदानंद नाईक
उल्हासनगर : पुनर्बांधणीच्या नावाखाली शाळेची इमारत पाडून हक्काच्या शाळेपासून वंचित झालेल्या मुलांनी महापालिकेसमोर भर पावसात आंदोलन केले. महापालिका शाळा क्रं-१८ व २४ मधील हजारो मुले एका खाजगी संस्थेच्या खोलीत धडे गिरवित असून हक्काच्या शाळेची मागणी यावेळी त्यांनी केली.
उल्हासनगर कॅम्प नं-२, खेमानी येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे मराठी शाळा क्रं-२४ व लिलाशाह हिन्दी माध्यम शाळा क्रं-१८ या दोन शाळेची इमारत पुनर्बांधणीच्या नावाखाली ४ वर्षापूर्वी जमीनदोस्त केली. तेंव्हा पासून महापालिका शाळेची इमारत उभी करू शकले नाही. दोन्ही शाळेतील हजारो विद्यार्थी एका खाजगी संस्थेच्या छताखाली शिक्षणाचे धडे गिरवीत आहेत. शिक्षण विभागाच्या सावळागोंधळामुळे अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे. मात्र महापालिका बघायची भूमिका घेत असून राजकीय पक्षांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप होत आहे. मनसेचे शहराध्यक्ष बंडू देशमुख, वंचित बहुजन आघाडीचे प्रा. प्रवीण माळवे, कायद्याने वागा संघटनेचे राज असरोंडकर यांनी याबाबत महापालिकेकडे पाठपुरावा केला. तर गेल्या आठवड्यात शाळेच्या मुलांना शहर दौऱ्यावर आलेल्या केंद्रीयमंत्री अनुराग ठाकूर यांच्याकडे नेण्याचा घाट राष्ट्रवादी पक्षाचे कमलेश निकम यांनी घातला होता.
कायद्याने वागा संघटनेचे अध्यक्ष राज असरोंडकर व वंचित बहुजन आघाडीचे प्रा प्रवीण माळवे यांच्या नेतृत्वाखाली शाळेच्या मुला समवेत भर पावसात हक्काच्या शाळेसाठी महापालिका प्रवेशद्वारा समोर निदर्शने केली. शाळा लवकर सुरु करा. या मागणीचे निवेदन अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर याना दिले असुन लवकरच सदर शाळा ह्या आगामी शैक्षणिक वर्षात सुरु करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिल्याची माहीती प्रा . प्रविण माळवे यानी दिली.