उल्हासनगर : महापालिका आयुक्त अजीज शेख व अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांच्या उपस्थित महापालिका शाळेतील मुलांचा प्रवेशोत्सव व शैक्षणिक साहित्याचे वाटप डॉ बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका शेजारील शाळेत केला. तसेच शाळा आयएसओ करण्याचा निर्धार आयुक्त अजीज शेख यांनी केला आहे.
उल्हासनगर महापालिका शाळेतील विद्याथ्यांना गणवेश, वह्या, दप्तर, बूट व मोजे, रेनकोट, लेखन साहित्य, पाण्याची बॉटल तसंच जेवणाचा डब्बा इत्यादी साहित्यांचे मोफत वितरण दरवर्षी करते. प्रवेशोत्सव व शैक्षणिक साहित्याचे वाटप कार्यक्रम महापालिका डॉ बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिकेत मंगळवारी दुपारी पार पडला. महापालिका आयुक्त अजीज शेख, अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत होते. यावेळी आयुक्त अजीज शेख यांनी मनोगत व्यक्त करुन विद्यार्थी व शिक्षकांना मार्गदर्शन केले. तसेच मुलांना पुढील वाटचालीकरीता मनापासून शुभेच्छा दिल्या आहेत.
महापालिका शिक्षण विभागांतर्गत असणाऱ्या सर्वशाळेतील विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासाकरीता क्रिडा महोत्सव व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असल्याचे आयुक्त म्हणाले. महापालिकेच्या ४ शाळा डिजिटलाईज केल्या असून सर्व शाळांमध्ये सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून सीसीटीव्ही कॅमेरे व इंटरनेटची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त अजीज शेख यांनी दिली. महापालिका शाळेत विविध उपक्रम राबविण्यात येत असून या उपक्रमाच्या सहाय्याने विद्यार्थ्यांकरीता पोषक तथा आनंदी शैक्षणिक वातावरण निर्माण करण्याचे काम सुरू आहे. मुलांचा प्रवेशोत्सव साजरा झाल्यानंतर त्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप आयुक्त अजीज शेख, अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर, उपायुक्त डॉ सुभाष जाधव, जनसंपर्क अधिकारी छाया डांगळे यांच्या हस्ते झाले. तसेच दरवर्षी शाळेतील विद्याथ्यांकरीता निःशुल्क सहलीचे आयोजन करण्यात येते. अशी माहिती छाया डांगळे यांनी दिली.