सदानंद नाईक, उल्हासनगर : महापालिका शाळेतील मुलांची संख्या कोरोना महामारीनंतर वाढली असतांना दुसरीकडे शाळेत सुखसुविधेचा अभाव असल्याचे उघड झाले. आयुक्त अजीज शेख यांच्यानंतर अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांनी मंगळवारी शाळेला भेट देऊन सुखसुविधा देण्याचे आदेश मंडळाला दिल्याने, नवीन वर्षात शाळेचे रुपडे बदलणार आहे.
उल्हासनगर महापालिका शिक्षण मंडळा अंतर्गत विविध माध्यमाच्या २८ शाळा सुरू आहेत. यापैकी सिंधी माध्यमाच्या शाळा मुलांच्या संख्या अभावी बंद करण्याची वेळ दोन वर्षांपूर्वी महापालिकेवर आली. ५० कोटी पेक्षा जास्त अंदाजपत्रक असलेल्या शिक्षण मंडळ अंतर्गतील शाळेची दुरावस्था झाली. महापालिका आयुक्त अजीज शेख यांच्याकडे शिक्षण मंडळाच्या समस्याचा पाडा काही सामाजिक कार्यकर्त्यांनी वाचल्यानंतर त्यांनी गेल्या आठवड्यात शिक्षण मंडळ कार्यालयाला भेट देऊन तब्बल तीन तास झाडाझडती घेतली. तसेच हजेरीपत्रकासह अनेक सूचना देऊन मंडळ कार्यालया महापालिका मुख्यालयात हलविण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांनी महापालिका शाळांना भेटी देऊन सुखसुविधेचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी शाळा इमारतीच्या दुरावस्थेसह अनेक समस्या एकून घेतल्या.
महापालिका शाळेतील मुलांची संख्या कोरोना महामारीनंतर वाढली असून ती कायम राहण्यासाठी शाळा इमारतीच्या पुनर्बांधणीसह इतर सुखसुविधा देण्याचा निर्णय महापालिका आयुक्त अजीज शेख यांनी घेतला. महापालिका शाळा क्रं-२४ व १८ मधील हजारो मुले इमारत अभावी एका खाजगी शिक्षण संस्थेत शिक्षणाचे धडे गिरवीत आहेत. मात्र त्याठिकाणी शौचालय व पिण्याच्या पाण्याचा व बसण्याचा अभाव पाहणी दरम्यान अतिरिक्त आयुक्त लेंगरेकर यांना आढळून आला. त्यांनी शाळा इमारत पुनर्बांधणी बाबत आयुक्तांकडे पाठपुरावा सुरू केला.
तसेच इतर महापालिका शाळेत शौचालय, पिण्याचे पाणी, बसण्याची असुविधा, ग्रंथालय, लेटलतीफ शिक्षक आदी समस्या पाहणी दरम्यान आढळून आल्या आहेत. त्यांनी यामध्ये सुधारणा करण्यासाठी आदेश काढले आहेत. एकूणच महापालिकेचे शिक्षण विभागाकडे कधीनव्हे लक्ष गेल्याने, नवीन वर्षात शाळांचे रुपडे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
शाळांच्या समस्या सोडविणार...लेंगरेकर महापालिका शिक्षण विभागावर कोट्यवधी रुपये दरवर्षी खर्च करूनही, शाळा समस्यांचे आगार झाले आहे. गरीब व गरजू मुलांना शिक्षण मिळण्यासाठी महापालिका कटीबद्ध आहे. त्यामुळे शाळेला लागणाऱ्या सुखसुविधा देण्याचा निर्णय महापालिका आयुक्तांनी घेतला आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"