उल्हासनगर : महापालिका नगररचनाकार विभाग सहायक संचालक नगररचनाकार, कनिष्ठ अभियंता अश्या दोन अधिकाऱ्या पुरता मर्यादित राहिला आहे. इतर पदे रिक्त असल्याने एकूणच विभागाच्या कामकाजावर प्रश्नचिन्हे उभे ठाकले. तर शहरातील अवैध बांधकाम नियमित करण्यासाठी स्थापन केलेली तज्ञ समिती ही अधिकारी विना असल्याचे उघड झाले.
उल्हासनगर महापालिका नगररचनाकार विभागाने गेल्या वर्षी ५५ कोटीचे उत्पन्न मिळून दिल्याने, विभागाकडे सर्वांचे लक्ष गेले. तर यावर्षी बांधकाम परवान्याचा ऑनलाईन, ऑफलाईनचा घोळ असतांना महापालिकेला ४० कोटीचे उत्पन्न विभागाने मिळून दिले. विभागातील दोन सहायक नगररचनाकार पदा पैकी एक तर ४ कनिष्ठ अभियंता पदा पैकी ३ पदे रिक्त आहे. म्हणजेच एक सहायक संचालक नगररचनाकार व एक कनिष्ठ अभियंता या दोन अधिकारा पुरता विभाग मर्यादित राहिला. तसेच शासन अध्यादेशानुसार शहरातील अवैध बांधकामे नियमित करण्यासाठी २ सहायक संचालक नगररचनाकार, २ कनिष्ठ अभियंता पदाला मंजुरी आहे. मात्र सद्यस्थितीत विभागातील सर्वच अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत. तर विभागाचा अतिरिक्त पदभार नगररचनाकार प्रकाश मुळे यांच्याकडे दिला आहे.
महापालिकेसह शेजारील महापालिका अंतर्गत सर्वाधिक गृहसंकुल उभे राहत आहेत. तर दुसरीकडे नगरविकास विभागाच्या दुर्लक्षामुळे महापालिका नगररचनाकार विभागातील बहुतांश पदे रिक्त आहेत. याचा परिणाम विभागाच्या कामकाजावर होऊन, कामावर मर्यादा आल्याची टिपण्णी नगररचनाकार प्रकाश मुळे यांनी केली. दोन अधिकारा पुरता राहिलेल्या नगररचनाकार विभागाला अवैध बांधकाम बाबत प्रभाग समितीच्या सहकार्याची अपेक्षा असते. मात्र प्रभाग समिती अवैध बांधकामाचा जबाबदारी झटकून मोकळीक होत असल्याने, शहरात अवैध बांधकामे फोफावल्याची प्रतिक्रिया नगररचनाकार प्रकाश मुळे यांनी दिली. स्थानिक राजकीय पक्षाच्या नेत्याच्या हस्तक्षेपामुळे, नगरविकास विभाग महापालिका नगररचनाकार विभागाला सहायक संचालक नगररचनाकार पदे देत नसल्याची टीका सर्वस्तरातून होत आहे.
नगरविकास विभागाचे दुर्लक्ष
ठाणे जिल्ह्यात महापालिकेची संख्या सर्वाधिक असून मोठ्या प्रमाणात गृहसंकुल महापालिका अंतर्गत उभे राहत आहेत. नगरविकास विभाग मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे असून त्यांचा ठाणे होम जिल्हा आहे. असे असताना महापालिकेतील नगररचनाकार विभागातील बहुतांश पदे रिक्त असल्याने, आश्चर्य व्यक्त होत आहे.