उल्हासनगर : महापालिका परिवहन बससेवा, बस डेपोची केंद्राच्या पथकाने पाहणी करून सुसज्ज डेपोसाठी १५ कोटी ३० लाख तर डेपोच्या संरक्षण भिंतीसाठी ३ कोटीचा निधी मंजूर केल्याची माहिती उपायुक्त अशोक नाईकवाडे यांनी दिली. तसेच परिवहन बससेवा उदघाटनासाठी सज्ज असल्याची माहितीही नाईकवाडे यांनी दिली.
उल्हासनगर परिवहन बससेवा सज्ज असून केंद्राच्या परिवहन पथकाने दोन दिवसांपूर्वी महापालिका परिवहन बससेवा, डेपो जागा, चार्जिंग स्टेशनची पाहणी केली. पाहणी केल्यानंतर महापालिकेच्या शहाड, रिजेन्सी-अंटेलिया व उल्हासनगर स्टेशन जवळील सुसज्ज बस डेपोसाठी केंद्राने १५ कोटी ३० लाखाच्या निधीला मंजुरी दिली. तसेच उल्हासनगर स्टेशन जवळील परिवहन बस डेपोसाठी वालधुनी नदीला संरक्षण भिंत बांधण्यासाठी ३ कोटीचा निधी मंजूर केल्याची माहिती उपायुक्त अशोक नाईकवाडे यांनी दिली. शहाड येतील महापालिका बस डेपोत ५ बसेस उभ्या असून ५ बसेस कंपनीत तयार आहेत. परिवहन बसेवेचे उदघाटन झाल्यावर केव्हाही बसेस सुरू होणार असल्याचे संकेत महापालिकेकडून देण्यात आली.
महापालिका परिवहन बस सेवेच्या चार्जिंग स्टेशन बांधण्याला यापूर्वीच केंद्राने ५ कोटीचा निधी दिला आहे. ३ पैकी २ चार्जिंग स्टेशन बांधून सज्ज झाले आहे. तर केंद्राकडून १०० बसेस महापालिकेला लोकसभा निवडणुकीनंतर मिळणार असून पावसाळ्यापूर्वी बसेस परिवहन विभागात दाखल होणार आहेत. महापालिकेच्या परिवहन बस सेवेमुळे कमीतकमी १ हजार नागरिकांना रोजगार उपलब्ध होणार असल्याचेही बोलले जात आहे. लोकसभा निवडणूक आचारसंहितापूर्वी महापालिका परिवहन बस सेवा रस्त्यावरून धावणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त अजीज शेख यांनी दिली. परिवहन बस सेवा सुरू होण्यासाठी आयुक्त अजीज शेख यांनी विशेष वरिष्ठस्तरावर प्रयत्न केले आहे. एकूणच शहरवासीयांना परिवहन बस सेवेची चाहूल लागली आहे.
परिवहन बस सेवेची प्रतिक्षा महापालिका परिवहन बस सेवा सुरू होण्यासाठी सज्ज असून ५ बसेस डेपोत उभ्या आहेत. तर ५ बसेस कंपनीत तयार व्यवस्थेत आहेत. चालक, वाहक आदी कर्मचाऱ्यांची कंत्राटी तत्वावर ठेकेदाराकडून घेतले असून उदघाटन होताच बसेस महापालिका रस्त्यावरून धावणार आहेत. तसेच शहरवासीयांची प्रतिक्षा लवकरच संपणार असल्याचे संकेत आयुक्त अजीज शेख यांनी दिली आहे.