उल्हासनगर : महापालिका परिवहन बस सेवेचा दिवाळीचा मुहूर्त टळला असून मुख्यमंत्र्यांच्या तारखेनंतर परिवहन बस सेवेचा मुहूर्त साधला जाणार असल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली. तोपर्यंत नागरिकांना अंतर्गत वाहतुकीसाठी खाजगी वाहने व रिक्षाचा वापर करावा लागत आहे.
उल्हासनगर महापालिका परिवहन बस सेवा सुरू करण्यासाठीं आयुक्त अजीज शेख यांनी शासनाकडे प्रयत्न केले. शासनाच्या स्वच्छ अभियान अंतर्गत महापालिकेला निधी मिळताच महापालिकेने एकून २० बसेस खरेदी केल्या. २० पैकी १० लहान व १० मोठ्या आकाराच्या बसेस असून लहान आकाराच्या बसेस शहर अंतर्गत सेवेसाठी तर मोठया आकाराच्या बसेस वातानुकूलित असून त्या नवीमुंबई, कल्याण, ठाणे, बदलापूर आदी मार्गावर धावणार आहेत. गेल्या महिन्यात एक बस ट्रायलसाठी शहरात येऊन आयुक्त अजीज शेख यांच्यासह अन्य जणांनी बसची सफर केली. दरम्यान पुन्हा केंद्र शासनाने १०० इलेक्ट्रिकल बसेसला मंजुरी दिली. त्यामुळे महापालिका परिवहन विभागाच्या ताफ्यात एकून १२० परिवहन बसेस राहणार आहेत. शहाड उड्डाण फुल शेजारी महापालिका भूखंडावर बस आगर व इलेक्ट्रिकल चार्जर स्टेशन उभारण्यात येत आहे. तसेच शहर अंतर्गत रस्त्यावर बस स्टॉप उभारण्याला मंजुरी मिळाली असून शहरातील जुने बस स्टॉपची दुरुस्त केले जाणार आहे.
महापालिकेकडे परिवहन बस सेवेसाठी पाहिजे असलेल्या सुखसुविधा उपलब्ध नसल्याने, बस सेवा खाजगी ठेकेदारा मार्फत चालविण्यात येणार आहे. मात्र त्यावर महापालिकेचे पूर्णतः नियंत्रण राहणार असल्याची माहिती आयुक्त शेख यांनी दिली. शहरवासीयांना दिवाळी पासून बस सेवेचा लाभ मिळण्याचे संकेत आयुक्त अजीज शेख यांनी सुरवातीला दिले होते. त्यानंतर परिवहन बस सेवा, सिंधू भवन व महापालिका रुग्णालयाचे उदघाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार असल्याचे बोलले जाते. तिन्हीं वस्तू उदघाटनासाठी तयार असून मुख्यमंत्री यांची तारीख मिळताच त्यांचे उद्घाटन होणार आहे.
नागरिकांच्या आनंदाचा हिरमोड
दिवाळीला महापालिका परिवहन बस सेवा सुरू होणार असल्याचे संकेत आयुक्तांनी दिले होते. त्यानंतर मुख्यमंत्री यांच्या संमतीच्या तारखेनंतर परिवहन बस सेवा सुरू होणार असल्याने, सर्वसामन्य नागरिकांचा हिरमोड झाला आहे.