सदानंद नाईक, उल्हासनगर: महापालिका परिवहन बस सेवेला हिरवा कंदील मिळाला असुन आयुक्त अजीज शेख यांनी अधिकाऱ्यां समावेत बस डेपोच्या जागेची पाहणी केली. महापालिका ३० कोटीच्या निधीतून २० इलेक्ट्रिकल बस खरेदी प्रक्रिया सुरू होण्याचे संकेत आयुक्तांनी दिले.
उल्हासनगर महापालिकेने खाजगी ठेकेदारा मार्फत काही वर्षांपूर्वी परिवहन बस सेवा सुरू केली होती. महापालिका बस सेवेला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद असतांना तिकीट दरवाढीवरून महापालिका व ठेकेदार आमनेसामने उभे ठाकले. महापालिकेने तिकीट तिकीट दरवाढीला मंजुरी दिली नसल्याने, ठेकेदाराने परिवहन बस सेवा बंद केली. तेंव्हा पासून परिवहन बस सेवा ठप्प आहे. तत्कालीन आयुक्त डॉ राजा दयानिधीं व उपायुक्त अशोक नाईकवाडे यांनी महापालिका परिवहन बस सेवा सुरू करण्याची प्रक्रिया सुरू केली. शहरातील प्रदूषण बघता महापालिकेने इलेक्ट्रिकल बस सुरू करण्याचा निर्णय त्यावेळी घेतला. ३० कोटीच्या निधीतून महापालिका १० एसी मिनीबस व ५२ सीटच्या १० बसेस खरेदी करण्यासाठी महापालिकेने निविदा काढल्या आहेत. निविदेला ३ कंपन्यांनी प्रतिसाद दिला असून परिवहन बस डेपोच्या जागेची पाहणी सोमवारी पालिका अधिकाऱ्यांसह केली.
महापालिका परिवहन बस सेवा सुरू करण्यापूर्वी आयुक्तांना परिवहन विभागाची स्थापना करावी लागणार आहे. त्यासाठी बस डेपो नियंत्रक, मॅनेजर, वाहक, तिकीट तपासनीस यासह इतर पदे भरण्यासाठी शासनाची मंजुरी घ्यावी लागणार आहे. अशी माहिती उपायुक्त अशोक नाईकवाडे यांनी दिली. बस डेपो मध्येच इलेक्ट्रिकल बसेससाठी चार्जर पॉईंट उभारावे लागणार आहे. एसी मिनीबस शहर अंतर्गत सेवेसाठी वापरण्यात येणार असून ५२ सीटच्या बसेस कल्याण, डोंबिवली, नवी मुंबई, मुंबई आदी ठिकाणी सेवा देणार आहेत. शहाड फाटक येथील एका गृहनिर्माण प्रकल्पातील १ एकर जागा महापालिकेला मिळणार असून त्याच ठिकाणी महापालिका परिवहन बस डेपो बांधण्यात येणार आहे. त्यासाठी महापालिकेची प्रक्रिया सुरू केल्याची माहिती उपायुक्त नाईकवाडे यांनी दिली आहे.