उल्हासनगर - महापालिकेच्या नगररचनाकार विभागाकडून नेमण्यात आलेल्या वादग्रस्त बांधकाम परवान्याच्या चौकशीचे काय, असा प्रश्न वणवा समता परिषदेने करत थेट मुख्यमंत्र्यांना साकडे घातले. भविष्यात वादग्रस्त बांधकामामुळे सर्वसामान्य नागरिक वेठीस येऊ नये, म्हणून पालिका नगररचनाकारासह संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी परिषदेने केली आहे.उल्हासनगर महापालिका नगररचनाकार विभाग सर्वाधिक वादात राहिला असून विभागाला लाभलेल्या बहुतांश नगररचनाकारांनी जेलची हवा खाल्ली आहे. तर, इतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडले आहेत.तत्कालीन नगररचनाकार प्रल्हाद पाटील, आॅन ड्युटी गायब झालेले संजीव करपे यांच्यासह अन्य जणांनी दिलेले बांधकाम परवाने वादात सापडले असून वादग्रस्त बांधकाम परवान्यांची पालिकेने चौकशी सुरू केली होती. वादग्रस्त बांधकाम परवानाप्रकरणी नियुक्त केलेल्या समितीने अद्यापही चौकशीचा अहवाल महासभा व आयुक्तांकडे सादर केलेला नाही. उलट, वादग्रस्त ठरलेल्या बांधकाम परवान्यांचे बांधकाम पूर्ण होऊन त्यांची खरेदीविक्री झाली आहे.वादग्रस्त बांधकामांमधील सदनिका खरेदी करू नका, असे प्रसिद्धिपत्रक नगररचनाकार विभागाने काढून स्वत:ची जबाबदारी झटकल्याची टीका वणवा समता परिषदेचे निलेश पवार यांनी केली आहे. त्यांनी निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, राधाकृष्ण विखे-पाटील यांना पाठवले आहे.वादग्रस्त परवान्यांची चौकशी गुलदस्त्यातमहापालिका नगररचनाकार विभागातील तत्कालीन नगररचनाकार यांनी दिलेले शेकडो बांधकाम परवाने वादात सापडून चौकशीच्या फेऱ्यात सापडले आहे.मात्र, आजपर्यंत चौकशीचा अहवाल गुलदस्त्यात राहिल्याने, आश्चर्य व्यक्त होत आहे.वणवा समता परिषदेने याबाबत आवाज उठवल्याने खळबळ उडाली आहे. प्रशासनाच्या भूमिकेकडे आता लक्ष लागले आहे.
उल्हासनगर पालिका : वादग्रस्त बांधकामप्रकरणी मुख्यमंत्र्यांना साकडे
By ऑनलाइन लोकमत | Published: February 03, 2019 3:12 AM