उल्हासनगर : शहरातील रस्त्यांची अतिशय दुरवस्था झाली असून त्यांची दुरूस्ती करा. खड्डे भरण्यासाठी ५ कोटींची तरतूद केली होती. मग ते गेले कुठे? अशा प्रश्नांचा भडिमार करत नगरसेवकांनी शहर अभियंता राम जैस्वार यांना धारेवर धरले. खड्डे भरले नसल्याची पोलखोल नगरसेवकांनी केली असून कंत्राटदाराला काळया यादीत टाकण्याची मागणी केली.उल्हासनगरमधील कोणत्या रस्त्यांची दुरूस्ती केली आणि कुठले खड्डे बुजवले असा प्रश्न नगरसेवकांनी महासभेत जैस्वार यांना केला. त्यावेळी त्यांनी अनेक रस्त्यांची नाव घेत काम झाल्याचे सांगितले. नगरसेवक शंकर लुंड, अरूण अशांत, प्रकाश नाथानी, सुनील सुर्वे, राजेश वानखडे, कविता बागूल यांनी त्यावर आक्षेप घेतला. त्यांनी प्रभागात रस्ते दुरूस्ती व खड्डे भरण्याचे काम झालेले नाही, असे सांगत पुन्हा खड्डे भरण्याची मागणी केली. रस्ता दुरूस्ती व खड्डे भरले जात नसल्याने धुळीचे साम्राज्य पसरल्याचे त्यांनी सांगितले.आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी रस्त्याची दुरूस्ती व खड्डे भरण्यास विशिष्ट मुदत कंत्राटदाराला दिली. त्या दरम्यान खड्डे झाले असतील तर कंत्राटदाराकडून पुन्हा खड्डे भरून घेण्यात येतील, असे आश्वासन आयुक्तांनी दिले. तसेच जोपर्यंत निविदेतील रस्ते खड्डेमुक्त दिसणार नाहीत तोपर्यंत कंत्राटदाराच्या कामाचे बिल थांबवा, असा आदेश संबंधित विभागाला दिला. मात्र वाढीव खर्च देणार नाही असे स्पष्ट शब्दात आयुक्तांनी सांगितले. रस्त्याच्या कामावरून नगरसेवक प्रकाश नाथानी व आयुक्त यांच्यात शाब्दीक चकमक उडाली.
उल्हासनगर पालिका : रस्ते दुरूस्तीवरून नगरसेवक संतप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2017 1:41 AM