उल्हासनगर : मालमत्ता कर वसूल करण्यासाठी पुन्हा एकदा महापालिकेने अभय योजना जाहीर केली आहे. ही योजना तीन टप्प्यात राबवली जाणार असून ११ ते २५ आॅक्टोबरपर्यंत ७५ तर त्यानंतर ५० व २५ टक्के दंड व व्याजदरात सूट देण्यात येणार आहे. साई पक्षाचे टोणी सिरवानी व कविता पंजाबी यांनी आणलेल्या प्रस्तावाला बहुसंख्य सदस्यांनी पाठिंबा दिला असून उद्यापासून ही योजना लागू होणार आहे.उल्हासनगर महापालिकेत अनेकदा अभय योजना राबवली. मात्र नागरिकांचा योजनेला प्रतिसाद मिळत नसल्याचे कारण देत गेल्या महासभेत अभय योजनेची मागणी आयुक्तांनी फेटाळली. अखेर नागरिकांच्या मागणीनुसार सिरवानी व पंजाबी यांनी महासभेत अभय योजनेचा प्रस्ताव आणला. या योजनेला सर्वच पक्षाच्या नगरसेवकांनी पाठिंबा दिल्याने आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांचा नाईलाज झाला. त्यांनी १०० टक्के व्याज माफ करण्याऐवजी सुरूवातीला १५ दिवसात जे मालमत्ता कर भरतील त्यांना ७५ तर त्यानंतर १३ डिसेंबरपर्यंत मालमत्ता कर भरणाºयांना ५० ते २५ टक्के व्याज माफ करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. योजनेचा नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन महापौर मीना आयलानी यांनी केले आहे.मालमत्ताकराची एकूण थकबाकी ३५० कोटीपेक्षा जास्त असून आयुक्त निंबाळकर यांनी अंदाजपत्रकात २८५ कोटीच्या वसुलीचे लक्ष्य ठेवले आहे. मात्र मालमत्ता कर वसुलीचा इतिहास पाहता १०० कोटीपेक्षा जास्त वसुली आतापर्यंत झालेली नाही. २८५ कोटी वसुलीचे लक्ष्य गाठण्यासाठी आयुक्तांनी बचत गटाच्या २०० महिलांना वसुलीसाठी नियुक्त केल आहे. मालमत्ता वसुलीत महिलांना अडथळा येऊ नये म्हणून त्यांना ओळखपत्र, वाहन व थकीत मालमत्तेला सील करण्याचे अधिकार दिले. मालमत्ता वसुली प्रकरणी ऐन दिवाळीत नागरिकात असंतोष निर्माण होऊ नये तसेच मालमत्ता कर वसुली व्हावी म्हणून अभय योजना राबवल्याचे बोलले जात आहे. १०० कोटीपेक्षा अधिक कर वसुलीचा अंदाज पालिका अधिकारी व्यक्त करत आहेत.अभय योजनेसाठी जनजागृतीमहापालिकेने लागू केलेल्या अभय योजनेचा लाभ नागरिकांना मिळावा यासाठी बहुतांश नगरसेवकांनी सोशल मीडियाचा वापर करत योजनेची माहिती प्रभागातील नागरिकांना देणे सुरू केले. तर काही नगरसेवक प्रभागातील नागरिकांमध्ये जाऊन अभय योजनेमुळे ७५ टक्के दंड व व्याज माफ होणार आहे. असे सांगून थकीत व चालू वर्षाचा मालमत्ता कर भरण्याचे आवाहन करत आहेत. नगरसेवकांसह पालिका अधिकारी व कर्मचाºयांनीही योजनेची जनजागृती सुरू केली.
उल्हासनगर पालिका : मालमत्ताधारकांना अखेर ‘अभय’, तीन टप्प्यात योजना राबवणार, महासभेत मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2017 2:22 AM