उल्हासनगर : बदलापूरच्या सावरकर चौकात रिक्षामध्ये बसलेल्या एका प्रवाशाने रिक्षाचालक श्रीकांत मंदोलीकर यांची ५० हजार रुपये किमतीची साेन्याची चेन लंपास केल्याची घटना रविवारी दुपारी घडली आहे. हाॅलमार्क मशीन घ्यायची असून, हाॅलमार्क तपासण्याच्या बहाण्याने ही चेन घेऊन पाेबारा केला. याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सावरकर चाैकात दुपारी १२ वाजता ४० वर्षांचा जाडजूड इसम बसला. त्याने ज्वेलर्सच्या दुकानात काम करीत असल्याचे सांगून हॉलमार्क मशीन आणण्यासाठी उल्हासनगर येथील पंजाबी कॉलनीत रिक्षा घेऊन आला. पंजाबी कॉलनीच्या एका गल्लीत जाऊन काही वेळाने परत आला. हॉलमार्क मशीन नसल्याचे सांगून मागच्या गल्लीत रिक्षा घेऊन गेला. तेथून परतल्यानंतर मशीन आहे, पण हॉलमार्क चिन्हे पाहण्यासाठी एखादी सोन्याची वस्तू आहे का? अशी विचारणा करून मांदाेलीकर यांच्या हातातील सोन्याची अंगठी घेतली. त्यानंतर पुन्हा परतल्यावर अंगठीवर हॉलमार्क चिन्हे नसल्याचे सांगून अंगठी परत केली. त्याने पुन्हा दुसरी सोन्याची वस्तू मागितली. त्यावर मांदाेलीकर यांनी सोन्याची चेन गळ्यातून काढून दिली. त्यानंतर ताे पुन्हा हाॅलमार्क मशीन आणण्यासाठी गेला. मात्र, बराच वेळ हाेऊनही ताे न परतल्याने मंदोलीकर यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. ताे कुठेच न दिसल्याने आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी मध्यवर्ती पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यावरून मध्यवर्ती पोलिसांनी चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पाेलीस चाेरट्याचा शाेध घेत आहेत.