उल्हासनगर: शिवसेना ठाकरे गटाचे शाखाप्रमुख सुरेश पाटील यांच्यावर उल्हासनगर पोलिसांनी तडीपार कारवाई केल्याने, शिवसेना ठाकरे गटाने नाराजी व्यक्त केली. शिवसेनेत दुफळी झाल्यानंतर खासदार श्रीकांत शिंदे यांच्या गोलमैदान येथील जनसंपर्क कार्यालयाच्या तोडफोड झाल्याचा गुन्ह्यात पाटील हे आरोपी होते.
उल्हासनगर कॅम्प नं-३ गोलमैदान परिसरात खासदार श्रीकांत शिंदे यांचे जनसंपर्क कार्यालय आहे. शिवसेनेत दुफळी झाल्यानंतर संतप्त झालेल्या काहीठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी खासदार शिंदे यांच्या जनसंपर्क कार्यालयाची तोडफोड केल्याने, एकच खळबळ उडाली होती. याप्रकरणी शाखाप्रमुख सुरेश पाटील यांच्यासह अन्य जनावर उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्या गुन्ह्यातील अनेक जणांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश घेऊन अनेकांना महत्वाचे पद मिळाले. दरम्यान तत्कालीन शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांच्यावर मध्यवर्ती पोलीस ठाण्यात अपहरण, फसवणूक आदी १९ गुन्हे दाखल होताच, त्यांनीही दुसऱ्याच दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन पाठिंबा दर्शविला. त्यानंतर त्यांनी पक्ष प्रवेश घेतला. दुसरीकडे शाखाप्रमुख सुरेश पाटील यांनी मात्र शिवसेना ठाकरे गट सोडला नाही.
दरम्यान शिवसेना शाखाप्रमुख यांच्यावर सन-२००६ पासून विविध गुन्हे दाखल आहेत. त्या गुन्ह्याच्या आधारे उल्हासनगर पोलिसांनी दोन दिवसापूर्वी पाटील यांच्यावर तडीपार कारवाई केली. अशी माहिती उल्हासनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप फुलपगारे यांनी दिली. दुसरीकडे पाटील यांनी खासदार शिंदे यांच्या जनसंपर्क कार्यालयाची तोडफोड केल्यानेच त्यांच्यावर तडीपारीची कारवाई केल्याचे बोलले जात आहे. शहरात गुन्हेगारीत वाढ झाली असतांना फक्त सुरेश पाटील यांच्यावरच तडीपार कारवाई का? असा प्रश्नही विचारला जात आहे. कार्यालय तोडफोडीतील इतर आरोपीनी शिंदे गटात प्रवेश केल्याने, ते स्वच्छ झाले का? अश्या चर्चेला शहरात ऊत आला आहे. तसेच पोलीस कारवाईवर प्रश्नचिन्हे निर्माण केले जात आहे.