उल्हासनगर : निवडणुक दरम्यान राजकीय पक्ष नेते व कार्यकर्त्यांतील वाद टाळण्यासाठी उल्हासनगर पोलीस ऍक्शन मोड मध्ये आले. सोमवारी रात्री पोलिसांनी राईड-स्कीमची प्रात्यक्षिके दाखवून सज्ज असल्याचे दाखवून दिले.
उल्हासनगरात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी उडाली असून सभा, बैठका, संवाद मेळावे, विविध पक्ष पदाधिकाऱ्यांच्या गाठीभेटीला सुरवात झाली आहे. तसेच प्रचारासाठी बॅनर्स, पोस्टर्स झळकणार आहेत. अशावेळी बॅनर फाडण्यावरून तसेच अन्य कारणांवरून वाद आणि दंगे निर्माण होण्याची शक्यता असते. त्यासाठी पोलिसांची तत्परता आणि रिस्पॉन्स टाइम तपासण्यासाठी पोलीस उपायुक्त सुधाकर पाठारे, सहायक पोलीस आयुक्त अमोल कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली मध्यवर्ती ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर आवताडे, विठ्ठलवाडी ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पडवळ यांनी राईड स्कीम प्रत्यक्षिकांच्या थराराचे आयोजन १७ सेक्शन परिसरातील मुख्य महामार्गावर सोमवारी रात्री केले होते. या राइड स्कीम प्रात्यक्षिकेत एसआरपीएफ जवानांची तुकडी, झोन फोर स्ट्राइकिंग, मध्यवर्ती पोलीस आणि विठ्ठलवाडी पोलीस सहभागी झाले होते. यावेळी दंगल नियंत्रित करण्यासाठी कोणत्या उपाययोजना करण्यात येतात. याबाबत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी ट्रेनिंग दिले आहे.