लोकमत न्यूज नेटवर्क
मुंब्रा : सध्या उल्हासनगर पोलीस ठाण्यात युनिट पोलीस निरीक्षक (गुन्हे) या पदावर कार्यरत असलेले तसेच मागील अडीच महिन्यांपासून यूएलसीच्या घोटाळ्याचा तपास करीत असलेल्या एसआयटी युनिटमध्ये कर्तव्य बजावत असलेल्या मनोहर पाटील यांनी २०१६ मध्ये मुंब्य्रात झालेल्या एका चिमुरड्याच्या हत्येच्या गुन्ह्याची यशस्वी उकल केल्याबद्दल त्यांना सर्वोकृष्ट तपासाचे केंद्रीय गृहमंत्री पदक जाहीर झाले आहे.
पोलीस दलात २५ वर्षे बजावलेल्या कामगिरीचे चीज झाले असून, मनापासून केलेल्या कामाची सरकारकडून हमखास दखल घेतली जाते, अशी भावना त्यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केली. मुंब्र्यातील गावदेवी परिसरातील एका महिलेवर एकतर्फी प्रेम करणारा संतोष शर्मा जेव्हा-जेव्हा तिला भेटायला जात होता, तेव्हा-तेव्हा तिचा सात वर्षांचा मुलगा जवळ असायचा. यामुळे त्याला तिला भेटता येत नव्हते. यामुळे त्याचा अडसर दूर करण्याच्या हेतूने १२ नोव्हेंबर २०१६ ला तो मंदिराच्या परिसरात खेळत असताना त्याने त्याचे अपहरण करून त्याला पडक्या चाळीतील एका घरात नेऊन तेथे त्याची गळा दाबून हत्या केली होती. तसेच त्याचा चेहरा ओळखू येऊ नये यासाठी दगडाने तो विद्रूप करून मृतदेह खड्ड्यात पुरला होता. एवढे हीन कृत्य केल्यानंतर तो चिमुरड्याच्या आईला फोन करून तिच्याकडे त्याच्याबद्दल चौकशी करीत होता. या घटनेमध्ये शर्मा याने कुठलाही पुरावा मागे ठेवला नव्हता. परंतु, तो फोन करून आस्थेने करीत असलेल्या चौकशीमुळे पोलिसांचा त्याच्यावर संशय बळावला होता. यामुळे तो फोन करीत असलेल्या फोनच्या ठिकाणाचे लोकेशन पडताळून पाटील यांनी त्याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता त्याने गुन्हा कबूल केला होता. पाटील यांनी आरोपीविरोधात न्यायालयात सादर केलेल्या भक्कम पुराव्यामुळे २० फेब्रुवारी २०२१ रोजी ठाणे येथील सत्र न्यायालयाचे न्यायाधीश आर. आर. वैष्णव यांनी शर्मा याला जन्मठेपेची तसेच दंडाची सजा सुनावली होती.