उल्हासनगर : नातेवाइकांमधील वाद मिटवण्यासाठी गेलेल्या पोलीस अधिका-यासह तीन पोलिसांना ८ जणांच्या टोळक्याने मारहाण केली. पोलीस निरीक्षक एस.पी. आहिर यांच्या पथकाने टोळक्याला अटक केली असून न्यायालयाने त्यांना २८ फेबु्रवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तर पोलीस उपनिरीक्षक भरत दराडे यांच्यावर कल्याण येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अधिक तपास एस. पी. आहिर करत आहेत.उल्हासनगर कॅम्प नं. १, धोबीघाट सेंच्युरी कंपनी गेट येथे राहणा-या यादव नातेवाइकांत हाणामारी झाली. त्यापैकी एक जण उल्हासनगर पोलीस ठाण्यात मदतीसाठी आला. घटनेचे गांभीर्य बघून पोलीस निरीक्षक (गुन्हे) एस.पी. आहिर यांनी सहा. पोलीस उपनिरीक्षक भरत दराडे, पोलीस नाईक वासुदेव डोळे, बाबासाहेब आव्हाड यांना मदतीसाठी धोबीघाट परिसरात पाठवले. पोलीस उपनिरीक्षक दराडे आणि इतर सहकारी पोलीस भांडण करणा-या यादव कुटुंबाला समजावून सांगत होते.मात्र, संतापलेल्या ८ जणांच्या टोळक्याने पोलिसांवर हल्ला केला. दराडे यांच्या डोक्यात लोखंडी रॉड मारल्याने ते गंभीर असून त्यांना कल्याण येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दखल केल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलीस नाईक बाबासाहेब आव्हाड, वासुदेव डोळे यांना मुका मार लागला आहे. शहरात पोलीस मारहाणीच्या घटनांत दिवसेंदिवस वाढ होत असून मारहाण प्रकरणी सक्त कारवाईची मागणी सर्व स्तरातून होत आहे.रवानगी पोलीस कोठडीत -उल्हासनगर पोलिसांनी जितेंद्र यादव, रामचंद्र यादव, पिंटू यादव, वीरेंद्र यादव, लालूकुमार यादव, सीतारामन यादव, भगीरथ यादव आणि गणेश यादव या आठ जणांवर सरकारी कामात अडथळा निर्माण करणे, हाणामारी करणे, असे गुन्हे दाखल करून अटक केली. न्यायालयाने २८ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
उल्हासनगर : पोलीस अधिका-यासह तिघांना मारहाण ! आठ जणांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2018 3:22 AM