उल्हासनगर : कॅम्प नं-५ येथील जीवन घोट गोशाळा शांत रूपाने चालविण्यासाठी गोकुलदास दुसेजा यांच्याकडे दोन कोटींची खंडणी मागणाऱ्या आरती दुसेजा यांच्यासह चार जणांवर हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. तसेच खंडणी न दिल्यास गोशाळेतील गायी मारण्याची धमकी दिली असून पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.
उल्हासनगर कॅम्प नं-५ परिसरात साई जीवन घोट गोशाळा असून ७ सप्टेंबर २०२१ रोजी सायंकाळी ६ वाजता आरती दुसेजा यांनी गोशाळा शांत स्वरूपात चालविण्यासाठी दोन कोटींची खंडणी आरती दुसेजा यांनी गोकुलदास दुसेजा यांच्याकडे मागितली होती. तसेच २३ डिसेंबर २०२१ रोजी दुपारी १२ वाजाता फोन करून गोशाळेची पाईपलाईन कापल्या बाबत सांगून लॉन्स समोर बोलावून आरती दुसेजा, त्यांचा मुलगा हितेश यांनी मागणी पूर्ण न केल्यास त्यांच्या गोशाळेतील गाई मारून टाकण्याची धमकी दिली होती. याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशानुसार आरती दुसेजा, हितेश दुसेजा, रोहित दुसेजा व एका अनोळखी इसमा विरोधात हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक एल एम सारिपुत्र यांनी दिली. अधिक तपास पोलीस करीत असल्याचे ते म्हणाले.