जितेंद्र कालेकरलोकमत न्यूज नेटवर्कठाणे: उल्हासनगरातील गर्भवती महिलेला लातूर येथील तिच्या मुळ गावी जाण्यासाठी पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी तातडीने परवानगी दिली. वेळीच मदत मिळाल्यामुळे पत्नीची मंगळवारी लातूरला सुखरुप प्रसूती झाली असून मुलगा झाल्याची गोड बातमी सचिन हैबतपुरे या टेलरने पोलीस आयुक्तांना बुधवारी दिली. या मदतीबद्दल पोलिसांचे त्याने विशेष आभार व्यक्त केले आहेत.एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार २ मे २०२० रोजी ठाण्याचे पोलीस आयुक्त फणसळकर यांच्या मोबाईलवर उल्हासनगर येथे वास्तव्याला असलेल्या सचिन हैबतपुरे याचा मेसेज आला. आपण मुळचे लातूरचे असून उल्हासनगरमध्ये टेलरचे काम करतो. कुटूंबासोबत (पत्नी आणि दोन वर्षांची मुलगी) लॉकडाऊनमुळे उल्हासनगरमध्ये अडकलो आहे. पत्नी नऊ महिन्यांची गर्भवती असून तिच्या देखभालीसाठी इथे कोणीही नाही. त्यामुळे पत्नीसह आपल्याला लातूरला जाण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती त्याने या मेसेजद्वारे केली. एका अनोळखी क्रमांकावरुन आलेल्या मेसेजची दखल घेत पोलीस आयुक्तांनी याबाबत चौकशी करुन ४ मे रोजी या कुटूंबाला लातूरला जाण्याची तात्काळ परवानगीही दिली. एका खासगी वाहनाने लातूरला पोहचल्यानंतरही सचिन यांनी आभार व्यक्त करीत पोलिसांबद्दल आदर वाढल्याचाही मेसेज आयुक्तांना केला. तसेच १४ दिवसांसाठी होम कॉरंटाईन झाल्याचेही सांगितले. त्यानंतर १९ मे रोजी मुलगा झाला. ‘तुमच्या मदतीमुळे सर्व काही सुरळीत पार पडले. या मदतीसाठी खूप खूप धन्यवाद’ असा मेसेज सचिन यांनी पुन्हा पाठविल्यानंतर पोलीस आयुक्त फणसळकर यांनी त्यांचे अभिनंदन केले. कधीही भेट किंवा बोलणे झाले नव्हते. पण सचिन यांचा मेसेज पाहून त्यांना लातूरला जाण्यासाठी तात्काळ परवानगी दिल्याचे फणसळकर यांनी ‘लोकमत’ला सांगितले. यात काही विशेष नसल्याचेही ते म्हणाले.
‘‘ लातूरला मुळ गावी आई आणि वडील होते. उल्हासनगरमध्ये पत्नी गर्भवती असल्यामुळे लातूरला जाण्यासाठी पोलिसांकडे आॅनलाईन परवानगी मागितली. अंबरनाथ पोलीस ठाण्यातही गेलो. अखेर २ आणि ३ मे रोजी थेट आयुक्तांच्या मोबाईलवर मेसेज करुन परवानगी मागितली. वेळीच दखल घेत आयुक्तांनी परवानगी दिल्याने दहा तासांमध्ये खासगी वाहनाने ५०० किमीचा प्रवास केला. आता पत्नीची सुखरुप प्रसुती झाली. इतक्या मोठया व्यक्तीने मेसेजला उत्तर देणे हेही आम्हाला अप्रूप होते. प्रत्यक्ष भेटूनच आयुक्तांचे आभार मानणार आहे.’’सचिन हैबतपुरे, लातूर