उल्हासनगर : पहिल्याच पावसाने गोलमैदान व फर्निचर मार्केट परिसरात पाणी तुंबल्याची घटना घडली असून नाले सफाईवर प्रश्नचिन्हे उभे ठाकले. तर बिर्ला गेट येथे जुने पिंपळाचे झाड पडून एका घराचे व रिक्षाचे नुकसान झाले. झाडांमुळे काहीकाळ वाहतुकीची समस्या उभी ठाकली होती.
उल्हासनगर महापालिकेने पावसाळ्यापूर्वी लहान मोठ्या नाल्याची सफाई केली असून १५ जून पूर्वी ९० टक्के नाले सफाई झाल्याचा दावा अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांनी केला होता. मात्र अतिरिक्त आयुक्तांचा दावा पहिल्याच पावसात खोटा ठरला. अर्धा तासाच्या पावसाने फर्निचर मार्केट, आयटीआय कॉलेज, गोलमैदान परिसरात पावसाचे पाणी तुंबल्याने, नागरिकांना जाण्या-येण्यास त्रास झाला. तसेच नाले सफाईचे पितळ उघड झाल्याची टीका सर्व स्तरातून होत आहे. बिर्ला गेट जवळील अंबिका ज्वलर्स दुकाना समोरील रस्त्यावर जुने पिंपळाचे झाड पडल्याने एका घराचे व रिक्षाचे नुकसान झाले. तसेच वाहतूक काहीकाळ ठप्प ठरली होती. अग्निशमन विभागाने घटनास्थळी धाव घेऊन झाड रस्त्याच्या बाजूला केले आहे.
शहरात सर्रासपणे प्लास्टिक पिशवीचे कारखाने सुरू असून प्लास्टिक पिशवी विक्रीही जोरात आहे. त्यामुळे नाले प्लास्टिक पिशव्याच्या कचऱ्याची तुडुंब तुंबल्यानंतरही महापालिका आयुक्त प्लास्टिक पिशव्या कारखाने व पिशवी विक्रीवर कारवाई करीत नसल्याची टीका होत आहे. तसेच नालेसफाईचे काम पूर्णतः झाले असून बहुतांश नागरिक सफाई केलेल्या उघड्या नालीत टाकत असल्याने, नाला कचऱ्याने तुंबत असल्याचे बोलले जात आहे.