उल्हासनगर : शीळफाटा परिसरात एमआयडीसीची मुख्य जलवाहिनी फुटल्याने उल्हासनगरसह अन्य शहरांचा पाणीपुरवठा बंद आहे. गेल्या तीन दिवसांपासून पुरवठा बंद असल्याने शहर पूर्व व कॅम्प नं ३ परिसरात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. उल्हासनगर महापालिकेकडे स्वतःचा पाणी पुरावठ्याचा स्रोत नसल्याने पाण्यासाठी एमआयडीसीवर अवलंबून राहावे लागते. शहर पूर्वेला एमआयडीसीच्या पालेगाव येथील जलसाठ्यातून पाणीपुरवठा होतो, तर शहर पश्चिमेला उल्हास नदीतून पुरवठा होतो. शहर पश्चिममधील बहुतांश भागाला पाणीपुरवठा होत असलातरी पूर्वेसह इतर शहरांना गेल्या तीन दिवासांपासून पाणीपुरवठा बंद आहे. महिलांवर पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ आली आहे. शीळ फाटा येथील दुरुस्ती केलेली जलवाहिनी पुन्हा फुटल्याने टंचाईची समस्या निर्माण झाल्याची माहिती महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सी.जी. सोनावणे यांनी दिली.
शहर पूर्वेतील काही भागात दिवसाआड पाणीपुरवठा होत असताना, गेल्या तीन दिवसांपासून पुरवठा बंद असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. महापौर लीलाबाई अशान, सभागृहनेते भरत गंगोत्री, शिवसेनेचे नेते धनंजय बोडारे, भारिपाचे शहराध्यक्ष शेषराव वाघमारे, प्रभाग समिती क्र. ४च्या सभापती अंजली साळवे यांच्यासह अन्य नगरसेवक पाणीपुरवठा सुरळीत सुरू करण्यासाठी एमआयडीसीच्या कार्यकारी अभियंता यांच्या संपर्कात आहेत. सोमवार सायंकाळपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत होणार असल्याची महिती सोनावणे यांनी दिली.
अंबरनाथमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा
अंबरनाथ : अंबरनाथ शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या एमआयडीसीच्या जलशुद्धिकरण केंद्रात दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आल्याने, गेल्या दोन दिवसांपासून कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. त्याचा फटका अंबरनाथ शहराला बसला असून, गेल्या दोन दिवसांपासून शहरात तीव्र टंचाई निर्माण झाली आहे.
अंबरनाथ नगरपालिका हद्दीत उल्हास नदीतून ४७ दशलक्ष लीटर पाणी आणि बारवी धरणातून एमआयडीसीमार्फत दहा दशलक्ष लीटर एवढ्या पाण्याचा पुरवठा करण्यात येतो. मात्र, बारवी जलशुद्धिकरण केंद्रात दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आल्याने एक दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला होता. मात्र, त्याचा फटका दुसऱ्या दिवशीही कायम राहिला, त्यातच एमआयडीसीची जलवाहिनी फुटल्याने पुन्हा पाणीपुरवठा खंडित करण्याची वेळ एमायडीसीवर आली. एमआयडीसीचा पाणीपुरवठा अंबरनाथ शहरासाठी बंद झाल्याने, त्याचा फटका शहरातील इतर भागाला सहन करावा लागला. शहरातील अनेक भागांत कमी दाबाने पाणीपुरवठा झाल्याने अनेक ठिकाणी टँकर मागविण्याची वेळ आली होती, तर सोमवारी पाणीपुरवठा सुरळीत होईल, असे सांगण्यात आले.