उल्हासनगर : महापालिकेने पावसाने विश्रांती घेताच रस्तादुरुस्ती आणि खड्डे भरण्याचे काम सुरू केले. यासाठी दोन कोटींच्या निधीची तरतूद केली आहे. नवरात्रोत्सवापूर्वी रस्ते चकाचक दिसतील, असे आश्वासन आयुक्त सुधाकर देशमुख यांनी दिले.उल्हासनगरात रस्त्याच्या दुरवस्थेमुळे दोन महिन्यांमध्ये चार जणांचे बळी गेले. पावसाने विश्रांती घेताच महापालिकेने रस्त्यातील खड्डे भरणे व दुरुस्तीचे काम सुरू केले. कॅम्प नं-१ मुरबाड रस्ता ते मच्छीमार्केट रस्त्याचे डांबरीकरणाचे काम सुरू केले. प्रभाग समितीनिहाय मुख्य चार रस्त्यांचे डांबरीकरण आणि खड्डे भरण्यात येणार आहेत. गेल्या आठवड्यात पालिकेने निविदा प्रक्रिया पूर्ण करून खाजगी कंत्राटदारामार्फत रस्त्याच्या कामाला सुरुवात केली. गेल्या आठवड्यात रस्त्यावरील खड्ड्यांविरोधात शिवसेनेने पालिकेवर मोर्चा काढला होता. त्यापूर्वी भाजप, ओमी टीम आणि मनसेनेही आंदोलन केले. नवरात्रीपूर्वी शहरातील बहुतांश रस्ते चकाचक होतील, असे आयुक्त देशमुख यांनी सांगितले. तसेच इतर रस्त्यांची दुरुस्तीही लवकरच सुरू होईल, असे त्यांनी सांगितले.शहरातील डांबरीकरणाच्या रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. निकृष्ट सिमेंट काँक्रिटच्या रस्त्यावरही डांबरीकरण करण्याची नामुश्की महापालिकेवर आली. नेताजी चौक ते कुर्ला कॅम्प रस्ता, तहसील कार्यालय रस्ता, व्हीनस चौक ते लालचक्की रस्ता, मोर्यानगरी रस्ता, गुरुनानक शाळा रस्ता, खेमानी रस्ता, विठ्ठलवाडी ते पवई चौक रस्ता, शहाड ते उल्हासनगर बसस्टॉप रस्ता, गायकवाडपाडा रस्ता, हिराघाट रस्ता, गुलशननगर रस्ता आदी रस्त्यांची दुरवस्था झाली. रस्तादुरुस्तीनंतर सहा महिन्यांत रस्ता उखडला अथवा रस्त्यात खड्डे पडले तर कंत्राटदाराने रस्त्याची दुरुस्ती करण्याची अट आहे. शहर अभियंता महेश शितलानी यांनी नवरात्री उत्सवापूर्वी रस्त्याची दुरुस्ती व खड्डे भरण्यात येतील, असे सांगितले.रस्ता अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांना मदतीची मागणीरस्त्यातील खड्ड्यांमुळे दोन महिन्यांत चार जणांचे बळी गेले आहेत. त्यांचे संसार उघड्यावर पडले. अपघातातील मृतांच्या नातेवाइकांना पालिकेने मदतीचा हात देण्याची मागणी शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी, नगरसेवक शुभांगी बहेनवाल यांनी महासभेत करून लेखी निवेदन दिले आहे.
उल्हासनगरचे रस्ते होणार नवरात्रोत्सवापूर्वी चकाचक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2019 12:29 AM