- सदानंद नाईक
उल्हासनगर : महापालिकेत शिवसेनेचे २५ नगरसेवक निवडून आले असून त्यापैकी १५ नगरसेवक एकनाथ शिंदे गटात आल्याची माहिती अरुण अशान यांनी दिली. यामुळे शहर शिवसेनेत खिंडार पडल्याचे बोलले जात असून इतर नगरसेवक शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची प्रतिक्रिया शिंदे गटाचे समर्थक अरुण अशान यांनी देऊन खळबळ उडून दिली.
उल्हासनगर महापालिकेवर सर्वाधिक शिवसेनेचा महापौर राहिला असून अशा औद्योगिक शहरावर वर्चस्व राहण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गट सक्रीय झाला आहे. अरुण अशान यांच्या नेतृत्वाखाली नगरसेवक लिलाबाई अशान, स्वप्नील बागुल, पुष्पा बागुल, राजेंद्र भुल्लर महाराज, महाराणी भुल्लर, कुलवंतसिंग बुटतो, संदीप सुर्वे, विजय पाटील, मीनाक्षी पाटील, आकाश पाटील, विकास पाटील, शुभांगी बेहेनवाल, सुरेश जाधव असे १५ नगरसेवक शिंदे गटात आल्याची महिती अरुण अशान दिली. तर अन्य जण संपर्कात असून ते केव्हाही मुख्यमंत्री शिंदे यांच्या सोबत येणार असल्याचे ते म्हणाले.
महापालिका निवडणुकी पूर्वी शहर विकासासाठी बहुतांश शिवसेना नगरसेवक शिंदे गटात आणण्याचा प्रयत्न असल्याचे अरुण अशान म्हणाले. येणाऱ्या महापालिकेत शिवसेना (शिंदे) व भाजप यांची सत्ता येणार असून शहर स्वच्छ व सुंदर करणारच, अशी माहिती अशान यांनी पत्रकारांना दिली. अरुण अशान यांच्या आई लिलाबाई अशान या दोन वेळा महापालिकेच्या महापौर राहिल्या असून ते स्वतः शिवसेनेचे उपशहरप्रमुख तसेच स्वीकृत नगरसेवक राहिले आहे. नगरसेवकासह शिवसेना पदाधिकारी मुख्यमंत्री शिंदे यांच्या संपर्कात असून निवडणुकी वेळी शहरातील चित्र वेगळे दिसणार असल्याचा विश्वास अरुण अशान यांनी व्यक्त केला. तर शिंदे गटाकडे गेलेले नगरसेवक कट्टर शिवसैनिक नसून दुसऱ्या पक्षातून आलेले उपरे असल्याची टीका शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी गुरूवारी झालेल्या शिवसेना कार्यकर्ता निर्धार मेळाव्यात केली.
शिंदे यांनी शिवसेनेत बंड केल्यानंतर ठाणे जिल्ह्यातून पहिली प्रतिक्रिया उल्हासनगरातून उमठली होती. गोलमैदान येथील खासदार श्रीकांत शिंदे यांच्या जनसंपर्क कार्यालयाची तोडफोड संतप्त शिवसैनिकांनी केला होता. तसेच तोडफोड प्रकरणी शिवसैनिकांना अटक झाल्याच्या निषेधार्थ शिवसैनिकांनी एकनाथ शिंदे यांच्या विरोधात घोषणाबाजी केली होती. या घोषणाबाजी करणाऱ्या विरोधात दिन दिवसांपूर्वीच उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. एकूणच शिंदे समर्थक व शिवसेना आमने-सामने येण्याची शक्यता आहे.