सदानंद नाईक, उल्हासनगर : शिंदेंसेनेचे शहर संघटक नाना बागुल यांनी रिपाइं आठवले गटात शेकडो कार्यकर्त्यांसह शुक्रवारी केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. यावेळी आठवले यांनी बागुल यांची उल्हासनगर शहरजिल्हाध्यक्ष निवड केल्याचे घोषित केले.
उल्हासनगर रिपाइं आठवले गटाचे शहरजिल्हाध्यक्ष व माजी उपमहापौर भगवान भालेराव यांची गेल्या महिन्यात पक्षप्रमुख व केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनी हकालपट्टी करीत पक्ष शहर कार्यकारणी बरखास्त केली होती. त्यानंतर शहरजिल्हाध्यक्ष पदासाठी पक्षाच्या नेत्यांकडून शहर पदाधिकारी व कार्यकर्त्या सोबत बैठक घेऊन चाचपणी केली. तेंव्हा बहुतांश पदाधिकारी व कार्यकर्त्यानी शिंदेसेनेचे शहर संघटक व पूर्वाश्रमीचे रिपाइं आठवले गटाचे शहरजिल्हाध्यक्ष नाना बागुल यांचे नाव सुचविले गेले. अखेर शुक्रवारी मुंबई येथे पक्ष प्रमुख व केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनी नाना बागूल यांच्यासह शेकडो समर्थकांना पक्ष प्रवेश देऊन, बागुल यांची शहरजिल्हाध्यक्ष पदी निवड केली. यानिवडीने रिपाइं आठवले गटाला पूर्वीचे वैभव येणार असल्याचे बोलले जाते.
नवनियुक्त शहरजिल्हाध्यक्ष नाना बागुल यांची आंबेडकरी जनतेत आकर्षण असून ते यापूर्वी पक्षाचे शहरजिल्हाध्यक्ष पदी राहिले आहेत. त्यामुळे कार्यकर्ते त्यांच्या सोबत जुडले आहे. त्यांच्या धर्मपत्नी पुष्पा बागुलव मुलगा स्वप्नील बागुल महापालिकेत शिवसेनेचे नगरसेवक राहिले आहेत. बागुल यांच्या पक्ष प्रवेशाने रिपाइंची ताकद वाढून विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवाराला बळ मिळणार असल्याचे बोलले जाते.