सदानंद नाईक
भाजप नेते व केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वक्तव्यावरून संतप्त झालेल्या शिवसेना पदाधिकाऱ्यांनी राणे यांच्या पुतळा व प्रतिमेला जोडे मारो आंदोलन केले. त्या दरम्यान शिवसेनेवर सातत्याने टीका करणारे भाजप नगरसेवक प्रदीप रामचंदानी यांना त्यांच्या कार्यालय व महापालिका मुख्यालयासमोर शिवसैनिक व युवासेनेक़डून मारहाण करण्यात आली.
उल्हासनगर शिवसेनेने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बाबत केलेल्या वक्तव्याचा निषेध केला. तसेच राणे यांच्या यांच्या पुतळ्याला व प्रतिमेला जोडो मारो आंदोलन केले. यावेळी शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी, उपशिवसेनाप्रमुख दिलीप गायकवाड, संदीप गायकवाड, राजेंद्र शाहू यांच्यासह पक्षाचे नगरसेवक, पदाधिकारी, शिवसैनिक उपस्थित होते. तर दुसरीकडे शिवसेनेवर नियमित आरोप करणारे भाजपचे नगरसेवक प्रदीप रामचंदानी यांना त्यांच्या कार्यालया समोर शिवसैनिक व युवासैनिकांनी अंगावर शाई टाकत मारहाण केली. रामचंदानी यांचे कार्यालय महापालिका मुख्यालय बाहेर आहे. त्या ठिकाणीच त्यांना मारहाण झाली. त्यावेळी महापालिकेत भाजपचे आमदार कुमार आयलानी, गणपत गायकवाड, पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते, सहायक पोलीस उपायुक्त डी टी टेळे आदीजन उपस्थित होते.
मारहाणीनंतर भाजप नगरसेवक प्रदीप रामचंदानी यांना मध्यवर्ती पोलिसांनी पोलीस सरंक्षणात पोलीस ठाण्यात नेले. याप्रकरणी शिवसेना पदाधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल होण्याचे संकेत पोलिसांनी दिले. रामचंदानी यांच्या मारहाणीचा भाजपकडून निषेध व्यक्त होत आहे. तर शिवसैनिकांनी धडा शिकविल्याची प्रतिक्रिया शिवसेनेच्या शहर नेत्यांनी दिली. एकूणच शहरात भाजप विरोध शिवसेना सामना रंगण्याची शक्यता आहे. माझ्यावरील हल्ल्याचा कायद्याने जबाब देणार असल्याची प्रतिक्रिया भाजप नगरसेवक प्रदीप रामचंदानी यांनी मारहाण प्रकरणी दिली.