सदानंद नाईक,उल्हासनगर : तालुका क्रीडा संकुलाच्या मंजुरीला ६ वर्षा पेक्षा जास्त कालावधी लोटूनही उभे राहिलेले क्रीडा संकुल तरुणांसाठी खुले होत नसल्याने, त्यांच्यात नाराजीचा सूर आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपकार्यकारी अभियंता पी टी मानकर यांनी मात्र लवकरच क्रीडासंकुलाचे उदघाटन होणार असल्याचे संकेत दिले आहे.
उल्हासनगराची लोकसंख्या ९ लाखा पेक्षा जास्त असून शहरात एकही आरक्षित खुले मैदान शिल्लक राहिले नाही. कॅम्प नं-२ येथील गोलमैदानाचे विविध ८ तुकड्यात विभाजन करण्यात आले असून एक खुला तुकडा मुलांसाठी खेळण्यासाठी राखीव न ठेवता, महापालिका भाडेतत्त्वावर देत आहे. तीच परिस्थिती कॅम्प नं-५ येथील दसरा मैदानाची झाली. कॅम्प नं-४ येथील व्हीटीसी मैदानावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने क्रीडा संकुल उभारले जात आहे. तर कॅम्प नं-५ येथील दसरा मैदानाच्या दुसऱ्या बाजूच्या खुल्या जागेवर तालुका क्रीडा संकुलाला सन-२०१८ साली मंजुरी मिळून दुसऱ्या वर्षी केंद्राच्या कामाला सुरवात झाली. मात्र क्रीडा संकुलाचे काम पूर्ण होऊनही तरुणांसाठी केंव्हा खुले होणार? असा प्रश्न तरुण करीत आहेत.
शहरातील मुलांच्या कलागुणांचा वाव देण्यासाठी शासनाने तालुका क्रीडा संकुलाला ६ वर्षांपूर्वी मंजुरी दिली. तेंव्हा पासून क्रीडा संकुल बांधणीचे काम सुरू आहे. मात्र एक संकुल उभे राहण्याला आमदाराला आपल्या आमदारकीच्या दोन टर्म खर्ची कराव्या लागत असल्याची टीका होत आहे. गेल्या आठवड्यात खासदार श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते एमएमआरडीएच्या रस्त्यासह विविध विकास कामाचे भूमिपूजन झाले. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून उभ्या असलेल्या तालुका क्रीडा संकुल, प्रांत कार्यालया प्रांगणात व तहसील कार्यालय प्रांगणात उभी राहिलेल्या नवीन प्रशासकीय इमारती उदघाटनाच्या प्रतिक्षेत आहेत. या तिन्ही इमारतीचे बांधकाम सार्वजनिक बांधकाम विभाग करीत असून विभागाच्या संथ व निकृष्ट बांधकामाचा सुरस कहाण्या शहरात ऐकायला मिळत आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या बांधकामाच्या चौकशीची मागणी :
शहर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पोलीस ठाणे, मध्यवर्ती रूग्णालयासह विविध शासकीय कार्यालय दुरुस्ती, त्यांच्या नवीन इमारती व राज्य व राष्ट्रीय रस्ते दुरुस्ती व बांधण्याचे काम आहे. मात्र त्यांच्या बांधकामावर प्रश्नचिन्हे उभे ठाकून चौकशीची मागणी होत आहे.