उल्हासनगर : शहरातील कॅम्प नं-५ दसरा मैदान येथे मंजूर झालेले तालुका क्रीडा संकुल, दोन आमदारांच्या श्रेयातून अनेक वर्षांपासून कागदावर आहे. आमदार बालाजी किणीकर यांनी शुक्रवारी तहसीलदार कार्यालय येथे आढावा बैठक घेऊन क्रीडा संकुलाच्या आशा पल्लवीत केल्या.
उल्हासनगर येथील दसरा मैदान येथे क्रीडा संकुल उभारण्यात यावे, याकरिता आमदार डॉ. बालाजी यांनी राज्य शासनाकडे पाठपुरावा केला. शासनाने क्रीडा संकुलासाठी 1 कोटींचा निधी 3 वर्षांपूर्वी मंजूर केला आहे. क्रीडा संकुलाचे श्रेयासाठी उल्हासनगरच्या आमदार ज्योती कलानी सक्रिय झाल्या असून दोन आमदाराच्या श्रेयात क्रीडा संकुलाचे काम रखडले.
प्रस्तावित क्रीडा संकुलामध्ये दोन बॅडमिंटन कोर्ट उभारणे, सुसज्ज बहुउद्देशीय हॉल उभारणे, फुटबॉल मैदान व जॉगिंग ट्रॅक बनविणे, तसेच मैदानावर असलेले विजेचे पोल व झाडे स्थलांतरित करणे आहे. याच विषयावर आमदार किणीकर यांनी तहसीलदार कार्यालयातील बैठकीत चर्चा करण्यात आली.
तालुका क्रीडा संकुलाचे काम लवकरच सुरुवात होण्याचे संकेत किणीकर यांनी बैठकीत दिले आहे. उल्हासनगर वासियासाठी अद्यावत सर्व सुविधाने सज्ज असे क्रीडा संकुल उपलब्ध होणार आहे. याबैठकीला तहसिलदार उत्तम कुंभार, जिल्हा क्रीडा अधिकारी शरद कलावंत, नगररचनाकार मिलिंद सोनवणी, तालुका क्रीडा अधिकारी प्रदीप डोके, बांधकाम विभागाचे उप विभागीय अभियंता डिलपे, संजय कोरडे, लहुजी सेनेचे राधाकृष्ण साठे, सचिन साठे, शाखा प्रमुख केशर लोणारे, राजू वालंज, रुग्णमित्र भरत खरे, पत्रकार सलिम मंसुरी तसेच संबंधित पोलीस अधिकारी व इतर अधिकारी उपस्थित होते.