- सुरेश लोखंडे
ठाणे - ‘'चला पुस्तकांशी दोस्ती करुया' या संकल्पनेतून उल्हासनगर महानगरपालिकेने सध्याच्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने मतदारांची अनोखी जनजागृती ५० हजार पुस्तकांच्या प्रदर्शनांतून व सवलतींच्या विक्रीतून करण्याचा नाविन्यपूर्ण उपक्रम उल्हासनगर महापालिका आयुक्त अजिज शेख यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेनेहाती घेतला आहे. १ मे या महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर हाती घेतला आहे. मतदार व पुस्तक प्रेमींसाठी हे भव्य प्रदर्शन ३ मेपर्यंत सर्वांसाठी खुले आहे, असे उल्हासनगर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त समिर लेंगरेकर यांनी सांगितले.
उल्हासनगर महानगरपालिकेतर्फे मतदारांची ही अनोखी जनजागृती करण्यात येत असलेला हा ५० हजार पुस्तकांच्या प्रदर्शनाचा नाविन्यपूर्ण उपक्रम उल्महासनगर हापालिकेचे आयुक्त अजिज शेख व अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांच्या संकल्पनेतून हाती घेण्यांत आलेला आहे. त्यासाठी यंत्रणा पूर्णपणे ताकदीनिशी कामाला लागली आहे.. यंदाचे वर्ष हे निवडणुकाचे वर्ष असल्यामुळे मतदारांमध्ये मतदानाच्या संदर्भात जनजागृती व्हावी यासाठी नाविन्यपूर्ण असे उपक्रम या पुस्तक प्रदर्शनाच्या निमित्ताने उल्हासनगर महानगरपालिकेतर्फे आयोजित केले जात आहेत. त्यापैकीच एक म्हणजे हे पुस्तक प्रदर्शन आहे.
या प्रदर्शनास भेट देणाऱ्या वाचकांना १० टक्के सवलत् मिळणारच आहे. पण ज्या वाचकांकडे मतदान ओळखपत्र असेल अशा वाचकांना अतिरिक्त १० टक्के म्हणजे एकूण २० टक्के सवलत पुस्तक खरेदीवर मिळणार आहे. इतकेच नाही तर ज्या वाचकांकडे मतदान ओळखपत्र नसेल त्यांना मतदान ओळखपत्र मिळवण्यासाठी जी प्रक्रिया आहे त्याची माहिती देण्यासाठी विशेष कक्ष या पुस्तक प्रदर्शनात असणार आहे. या कक्षात मतदान ओळखपत्राची प्रक्रीया सुरु केल्यास त्या वाचकाला देखील अतिरिक्त १० टक्के सवलतीचा लाभ पुस्तक खरेदीवर घेता येणार आहे. त्यासोबतच या पुस्तक प्रदर्शनात मतदार जनजागृतीसाठी एक प्रतिज्ञा वाचकांकडून लिहून घेतली जाणार आहे आणि त्यापैकी एका भाग्यवान विजेत्याला दर दिवशी विशेष पारितोषिक दिले जाणार आहेत.
मतदार जनजागृती करीत असतानाच उल्हासनगर महानगरपालिकेतील बालकांचा विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी ही विशेष उपक्रम या पुस्तक प्रदर्शनाच्या निमित्ताने आयोजित केला जाणार आहे. हे पुस्तक प्रदर्शन १ ते ३ मे २०२४ रोजी असे तीन दिवस सकाळी १० ते सायंकाळी ८ वाजेपर्यंत चालू राहणार आहे. या पुस्तक प्रदर्शनात उल्हासनगर महानगरपालिकेच्या अखत्यारितील विविध शाळांच्या विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक अभ्यासक्रमाव्यतिरिक्त इतर उपक्रमात विशेष नैपुण्य मिळवणारा विद्यार्थ्यांचा तर सत्कार करण्यात येणारच आहे. पण त्या विद्यार्थ्यांसोबत त्यांच्या या नैपुण्याला विशेष प्रोत्साहन देणाऱ्या त्यांच्या पालकांचा, त्यांच्या शिक्षकांचा आणि शाळेच्या मुख्याध्यापकांचाही विशेष सत्कार यानिमित्ताने करण्यात येणार आहे. यामुळे अधिकाधिक विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळू शकेल, अशी यामागील कल्पना आहे त्यासोबत उल्हासनगरमधील रहिवासी असणारे अभिषेक टाले हे नुकतीच प्रतिष्ठेची केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. त्यांचाही विशेष सत्कार यावेळी आयोजित करण्यात येणार आहे. या पुस्तक प्रदर्शनात येणाऱ्या विद्यार्थ्यांपुढे आदर्श निर्माण व्हावा हा त्यामागील उद्देश.
उल्हासनगर विधानसभा मतदारसंघाची स्वीप (SVEEP) टीम मतदान प्रक्रियेमध्ये मतदारांचा जागरूकपणे सहभाग वाढावा यासाठी यावेळी आपले विविध उपक्रम पुस्तक प्रदर्शनात करणार असल्याचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी विजयानंद शर्मा यांनी सांगितले. या तीन दिवसीय पुस्तक प्रदर्शनास आपण भेट द्यावी असे आवाहन आयुक्त अजिज शेख व अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांनी सर्व नागरिकांना केले आहे.
उल्हासनगर शहराबाहेरील कल्याण, अंबरनाथ, बदलापूर येथील पुस्तक प्रेमी नागरिकांनी या प्रदर्शनास भेट द्यावी. ५० हजारपेक्षा जास्त मराठी, इंग्रजी, हिंदी व सिंधी पुस्तके या प्रदर्शनात असतील. यासाठी सदामंगल पब्लिकेशन ही संस्था सहकार्य करत आहे.