Ulhasnagar News : पोलिसांचा धाक राहिलाय की नाही? असा प्रश्न हा व्हिडीओ बघून पडू शकतो. आधी मद्यधुंद अवस्थेत रिक्षा चालवला. तरुणीच्या गाडीला धडक दिली आणि नंतर पोलीस ठाण्यात घेऊन जाणाऱ्या पोलिसाच्याच रिक्षाचालकाने कानशिलात लगावली. इतकेच नाही, तर त्याला बेदम मारहाण केली. हा संतापजनक प्रकार घडला आहे उल्हासनगरमध्ये. घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला असून, मुजोर रिक्षाचालक कशा पद्धतीने मारहाण करत आहे, हे सगळे कॅमेऱ्यात कैद झाले आहे.
वाहतूक पोलिसाला रिक्षाचालकांची मारहाण, नक्की काय घडले?
उल्हासनगरमधील कॅम्प नं ३ येथील छत्रपती शाहू महाराज उड्डाण पूलावर ही घटना घडली. शुक्रवारी (६ सप्टेंबर) दुपारी तीन वाजता खड्डे भरण्याचे काम सुरू होते. त्यामुळे वाहतूक कोंडी झाली. यावेळी एका मद्यधुंद अवस्थेत असलेल्या रिक्षाचालकाने तरुणीच्या दुचाकीला धडक दिली.
धडक दिल्यानंतर रिक्षाचालकाने तरुणीसोबत वाद घालायला सुरूवात केली. यावेळी कर्तव्यावर असलेले वाहतूक पोलीस मोहन पाटील घटनास्थळी गेले. त्यांनी त्याला जाब विचारला. रिक्षाचालक मद्यधुंद अवस्थेत रिक्षा चालवत असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. त्याला पोलीस ठाण्यात चालण्यास पाटील यांनी सांगताच रिक्षाचालकाने त्यांच्या कानशिलात लगावली.
वाहतूक पोलिसावर दोन-तीन रिक्षाचालकांचा हल्ला
मद्यधुंद अवस्थेत असलेल्या रिक्षाचालकाने वाहतूक पोलीस मोहन पाटील यांना कानाखाली मारल्यानंतर पाठीमागून दुसऱ्या रिक्षाचालकाने त्यांना थापड मारली. त्यानंतर रिक्षाचालकाने त्यांच्यावर बाटलीतील पाणी फेकले, तर दुसऱ्या रिक्षाचालकाने पाटील यांना मागे खेचले. तोल जाऊन ते रस्त्यावर साचलेल्या पाण्यात पडले.
फरार रिक्षाचालकाला अटक
काही लोकांनी रिक्षाचालकांना थांबवण्याचा प्रयत्न केला. पण, दोघेही वाहतूक पोलिसाच्या अंगावर धावून गेले आणि मारहाण केली. हा सगळा प्रकार कॅमेऱ्यात एका व्यक्तीने टिपला. घटनेनंतर रिक्षाचालक फरार झाले. दरम्यान, पोलिसांनी पाठलाग करून या रिक्षाचालकाला अटक केली असून, त्याविरोधात मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.