उल्हासनगर : अमृत योजनेअंतर्गत वडोलगाव, शांतीनगर येथील जलशुद्धीकरण केंद्रासह अग्निशमन दलाची बोट, भुयारी गटार साफ करण्यासाठी रोबो आदींचे लोकार्पण मंगळवारी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते व्हीटीसी मैदानात होणार आहे. त्याच बरोबर २५ कोटींच्या निधीतून व्हीटीसी मैदानात भव्य क्रीडा संकुलाचे भूमिपूजन होणार असल्याची माहिती महापौर लीलाबाई अशान यांनी दिली.
उल्हासनगर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी शिवसेना व मित्र पक्षांनी विकासकामांचे लोकार्पण व भूमिपूजन सोहळ्याचे आयोजन मंगळवारी व्हीटीसी मैदानात केले आहे. केंद्र व राज्य शासनाच्या मदतीने भुयारी गटार योजनेचे काम सुरू आहे. पहिल्या टप्प्यात भुयारी गटारीची मुख्य वाहिनी पूर्णतः नव्याने टाकण्यात आली असून, दुसऱ्या टप्प्यात जलशुद्धीकरण केंद्र शांतीनगर व वडोलगाव येथे उभारण्यात आले आहे. दोन्ही केंद्रांचे काम सुरळीत सुरू झाले असून, त्यांचा लोकार्पण सोहळा मंगळवारी होणार आहे.
अग्निशमन दल अधिक कार्यक्षम होण्यासाठी त्या विभागाकरिता अत्याधुनिक बोट खरेदी करण्यात आली. तसेच भुयारी गटारांची साफसफाई करण्यासाठी रोबो घेण्यात आला असून, त्यांचेही लोकार्पण पालकमंत्री शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. व्हीटीसी मैदानात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने २५ कोटींच्या निधीतून भव्य क्रीडा संकुल उभे राहणार असून, त्याचा भूमिपूजन सोहळा मंगळवारी दुपारी ३ वाजता पालकमंत्री शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. क्रीडा संकुल उभे राहण्यासाठी शिवसेना उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत बोडारे, नगरसेवक धनंजय बोडारे यांनी शासनाकडे सतत पाठपुरावा केला. महापौर लीलाबाई अशान यांच्या प्रयत्नाने १०२ कोटींचा निधी गेल्या महिन्यात शहराला मिळाल्याची माहिती नगरसेवक अरुण अशान यांनी दिली.