सदानंद नाईक, उल्हासनगर: शहरातील पाणी टंचाईला पूर्णविराम देण्यासाठी एमआयडिसीने एक्सप्रेस फिडरला एनओसी दिल्याने, वीज पुरवठा खंडित न होता पाणी पुरवठा सुरळीत होणार आहे. खासदार श्रीकांत शिंदे, उद्योगमंत्री उदय सामंत, आयुक्त अजीज शेख यांच्या बैठकीनंतर अवघ्या तीन दिवसात निर्णय झाल्याची माहिती शिंदे गटाचे अरुण अशान यांनी दिली. उल्हासनगरातील विविध विभागात पाणी टंचाई निर्माण झाली असून गेल्या आठवड्यात शिवसेनेने महापालिकेवर मोर्चा काढला होता. शहरातील पाणीटंचाईला विराम देण्यासाठी खासदार श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने तीन दिवसांपूर्वी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासोबत बैठक घेतली. बैठकीला महापालिका आयुक्त अजीज शेख, शिंदे गटाचे प्रमुख अरुण अशान, पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी वारंवार विधुत पुरवठा खंडित होत असल्याने, एक्सप्रेस फिडरची मागणी महापालिका कडून करण्यात आली. तसेच जुन्याच दरात मंजूर वाढीव ५० एमएलडी पाणी पुरावठ्याला मान्यता देण्यात आली.
शहाड पाणी पुरवठा स्त्रोत महापालिकेकडे हस्तांतरित केल्यास, शहराला मुबलक पाणी पुरवठा होणार असल्याची मागणी शिंदे गटाचे अरुण अशान यांनी यावेळी केली. यासर्व मागणीला उदय सामंत यांनी अधिकाऱ्यांना त्वरित अभ्यास करून निर्णय घेण्याचे आदेश दिले होते. यावेळी शहराला उच्चदाबाने पाणी पुरवठा होण्यासाठी एक्सप्रेस फिडरची मागणी झाल्यावर, उधोगमंत्री सामंत यांनी तसे आदेश अधिकाऱ्यांना दिले होते. अवघ्या तीन दिवसात एक्सप्रेस फिडरला एमआयडीसी कडून मान्यता मिळाल्याने, वीज पुरवठा खंडित न होता, शहराला पाणी पुरवठा होणार असल्याने, पाणी टंचाई निकालात निघणार आहे.
वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्यानेच, पाणी पुरावठ्यावर परिणाम होऊन पाणी टंचाई निर्माण झाली होती. मात्र एक्सप्रेस फिडरने वीज पुरवठा खंडित होणार नसल्याने, मुबलक पाणी पुरवठा होणार आहे. १२० एमएलडी पाणी पुरावठ्या पेक्षा जास्त पाणी पुरावठ्याला ८ ऐवजी १२ रुपये दराने एमआयडीसी कडून बिल आकारले जात होते. आता जुन्याच ८ रुपये दराने बिल आकारण्यात येणार असून ५० एमएलडी वाढीव पाणी पुरावठ्याला मान्यता आली. महापालिका अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांनीही एक्सप्रेस फिडरला मंजुरी मिळाल्याला दुजोरा दिला.
चौकट शिंदे सरकारचा झटपट निर्णय शहरातील पाणी टंचाईवर अवघ्या तीन दिवसात तोडगा काढला आहे. यापुढे मुबलक पाणीपुरवठा होणार असून पाणी टंचाईला पूर्णविराम मिळाल्याचे अशान म्हणाले.